शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:प्रतिभा असूनही व्यापक संधी मिळत नसलेल्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.असे आश्वासन प्रसिद्ध लोकगीतकार,गायिका शीतल साठे यांनी येथे दिले.
प्रतिभावान मात्र दुर्लक्षित कलाकारांना योग्य ती संधी मिळवून देण्यासाठी साठे व त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत.येथील मदारी वस्तीमध्ये गुणी कलाकार आहेत.मात्र गेली अनेक वर्ष संधी अभावी त्यांना अपेक्षित व्यासपीठ न मिळाल्याचे येथील वात्सल्यसिंधू फाउंडेशनच्या सचिव उषा वाखारे यांनी साठे यांच्या निदर्शनास आणले.यावर साठे यांनी मदारी वस्तीला भेट दिली.यावेळी वस्तीतील हुसैन मदारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जादूचे प्रयोग सादर केले.विविध प्रकारचे प्रयोग सादर केले.मात्र त्यांचा एक कलाकार जमिनीवर निद्रावस्थेत असतो. हुसैन भाई त्याला आदेश देताच तो जमिनी पासून साडेतीन फूट उंच उड्डाण घेतो.या प्रयोगाला साठे यांच्या बरोबरच उपस्थितांनी मोठी दाद दिली.यानंतर याच कलाकाराने डोळ्याने २५ किलो वजन उचलण्याचे कसबही दाखवले.जादूचे प्रयोग सुरू करण्यापूर्वी हुसैन भाईंनी बासरीवर उत्कृष्ट गाणे सादर केले.चिराग मदारी यांनी ढोलकीवर सुंदर अशी साथ दिली.यानंतर हनीफ मदारी यांनी आपल्या पहाडी आवाजात कव्वाली सादर केली.कसलेही संगीत शिक्षण नसताना या तिघांनी सादर केलेली कला पाहून साठे अचंबित झाल्या.
शिक्षणा अभावी मदारी समाज कायम दुर्लक्षित राहिला.सापाचे खेळ दाखवून हा समाज उदरनिर्वाह करायचा.या खेळावर बंदी आली.यामुळे आता जादूचे प्रयोग सादर करतात.हीच कला मोठ्या व्यासपीठावर सादर करणारे कलाकार आर्थिक सक्षम झाल्याचे आपण पाहतो.मदारी समाजातील कलाकारांमध्ये अशाच स्वरूपाची प्रतिभा असूनही त्यांना आर्थिक स्थैर्य नाही.साठे यांनी या कलाकारांची कला पाहून त्यांचे खूप कौतुक केले.त्यांना योग्य ते व्यासपीठ मिळवून देण्याचे आश्वासन दिले.उषाताई वाखारे या या वस्तीतील लहान मुलांसह प्रौढ,वृध्द व्यक्तींपर्यंत सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करीत आहेत.त्यांनीही या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे साठे यांना आवाहन केले. नगरसेविका मनीषा कालेवांर,आदिशक्ती महिला मंडळाच्या संस्थापिका शशिकला काळे,सचिव लता नाझीरकर,नीता सतिजा,शिक्षण मंडळाचे माजी सभापती निलेश खाबिया राष्ट्रवादी युवकचे (अजितदादा गट)शहराध्यक्ष एजाज बागवान,मदारी समूहाचे अध्यक्ष चिरागौद्दीन मदारी आदी यावेळी उपस्थित होते.