शिरूर:रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील झामील स्टील बिल्डिंग इंडिया या कारखान्याने विनापरवानगी झाडांची कत्तल केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी या मागणीसाठी मानव विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष संदीप कुटे यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज वनविभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला असून कारखान्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी ‘शिरूरनामा’शी बोलताना सांगितले.
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
कुटे यांच्या म्हणण्यानुसार पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम राबविली जाते.अकारण झाडांची कत्तल होऊ नये म्हणून कायद्याची कडक नियमावली देखील आहे. काही कारणास्तव झाड तोडायचे असल्यास यासाठी रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असताना झामिल स्टील या कारखान्याच्या आवारातील जवळपास ४० ते ५० विविध प्रकारच्या झाडांची कोणत्याही संबंधित विभागांची परवानगी न घेता कत्तल करण्यात आली आहे.अशा प्रकारे झाडांची कत्तल करणे कायद्याचे उल्लंघन आहे. मानव विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले असून कारखान्यावर दंडात्मक कारवाईची मागणी केली.मात्र प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही. मानव विकास परिषद ही पर्यावरण रक्षणासाठी काम करीत असून पर्यावरणाच्या मुळावर कोणी घाव घालत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. झामील स्टील कारखान्याच्या याच प्रवृत्तीच्या विरोधात आमचे आंदोलन असून जोपर्यंत या कारखान्यावर दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण सुरू राहणार असल्याचे कुटे यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध वक्त्यांनी कारखान्याच्या धोरणाविरोधात टीका केली.
याबाबत कारखाना प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,त्यांनी पत्रकारांना भेटण्यास नकार दिला.आज सकाळी वनविभागाचे वनपाल व वनरक्षक कारखान्याच्या आवारात ज्या ठिकाणी झाडांची कत्तल करण्यात आली त्याचा पंचनामा करण्यास गेले असता, त्यांना कारखान्याच्या आत येण्यास मज्जाव करण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हसेकर यांनी सांगितले. वास्तविक शासकीय अधिकाऱ्यांना अशा प्रकारे मज्जाव करणे चुकीचे आहे.कारखाना आवारात प्रवेश करण्यासाठी आम्हाला पोलिसांचे सहकार्य घ्यावे लागले. पोलीस आल्यानंतर वनपाल म्हेत्रे व वनरक्षकांना कारखाना आवारात प्रवेश देण्यात आला.त्यांनी ज्या ठिकाणी झाडांची कत्तल झाली तेथील भागाचा पंचनामा केला.कंपनीने झाडांची कत्तल केल्याचे मान्य केले असून उद्या त्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे म्हसेकर यांनी सांगितले.
मानव विकास परिषदेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख संतोष कुटे,कायदेशीर सल्लागार मीना गवारे, शिरूर तालुका संपर्कप्रमुख किरण इंगळे,तालुका अध्यक्ष संगीता रोकडे,प्रदेश सोशल मीडिया प्रमुख मोनाली केदारे,भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील पाचुंदकर, तालुकाध्यक्ष काशिनाथ पाचंगे,मनसे जनहित कक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे,रवी गुळादे,
वात्सल्यसिंधू फाउंडेशनचे संचालक विजय लंघे, हरिदास शिंदे,गंगेश्वर सोनवणे, देविदास गायकवाड,गणेश फंड, सचिन हरगुडे,अक्षय खेडकर, चेतन फंड,हर्षल पाचंगे, सतीश रासकर,अभिजीत बत्ते आदी यावेळी उपस्थित होते.