वीजचोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:वीजचोरी प्रकरणी गोलेगाव येथील दोन तर अण्णापूर येथील एका ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता महेश बेसुळके यांनी दिली.

     नोव्हेंबर २०२२ मध्ये गोलेगाव येथे दोन ठिकाणी वीजचोरी केली जात असल्याची खात्रीलायक माहिती महावितरणला प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक अभियंता बेसुळके यांच्यासह त्यांचे सहकारी निलेश आगलावे व दोन पंच यांनी अंगद वाखारे व हेमंत इसवे यांच्या घरी धाड टाकून तपासणी केली असता वीजचोरी झाली असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले.वाखारे हे मीटरचा वापर न करता शेतातील घराजवळील रोहित्रावरून अनधिकृतपणे वीज वापर करीत होते.१६ फॅन, २ टेलिव्हिजन,१ रेफ्रीजरेटर,१६ बल्ब,एक मिक्सर,एक कडबाकुट्टी,एक दूध काढणी मशीन व इतर घरगुती वस्तूंचा वापर असा वापर केल्याचे यावेळी आढळून आले.पंचांसमक्ष अनधिकृत सप्लाय बंद करून वीजचोरी साठी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची वायर पथकाने जप्त केली होती.वाखारे यांनी ३ नोव्हेंबर २०२० ते २ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ४९५३ युनिट वीजचोरी केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले होते.वाखारे यांना १ लाख १० हजार ३३० रुपयांचे वीजचोरीचे  तसेच  १४ हजार रुपये तडजोड रक्कम बिल असे एकूण मिळून १ लाख २४ हजार ३३० रुयांचे बिल देण्यात आले होते. गोलेगांव येथीलच हेमंत इसवे यांनीही घराशेजारील रोहित्रावरून अनधिकृतरीत्या घरगुती वापरासाठी वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले होते.पंचांसमक्ष त्यांचाही सप्लाय बंद करून वीजचोरी साठी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची वायर पथकाने जप्त केली होती.एक जानेवारी २०२१ ते २ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत चोरी केल्याचे आढळून आले होते इसवे यांना वीजचोरीचे ६ हजार ५१० व तडजोड बिल २ हजार असे मिळून ८ हजार ५१० रुपयांचे बिल देण्यात आले होते.
         अण्णापूर येथील वैशाली रासकर व गुलाब रासकर यांच्या दुकानात मीटर बायपास करून व्यावसायिक वीज वापर करीत होते.एक कॉम्प्रेसर,एक बोअरवेल मोटर,एक मर्क्युरी बल्ब,दोन ट्यूब, वेल्डिंग मशीन (बंद) व इतर व्यावसायिक वस्तू असा त्यांचा वापर होता.   नोव्हेंबर २०२१ ते २ नोव्हेंबर २०२२  या कालावधीत  ३६० युनिटची चोरी केल्याचे आढळून आले होते.यासाठी त्यांना  २४ हजार २६० वीजचोरीचे व तडजोडीचे २० हजार असे मिळून ४४ हजार २६० रुपयांचे बिल देण्यात आले होते.या तीनही प्रकरणात महावितरणने दिलेले बिल न भरल्याने सहाय्यक अभियंता बेसुळके यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.