शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:विद्यार्थीदशेत मनाविरुद्ध जगा म्हणजे आयुष्यभर मनासारखे जगता येईल असा मोलाचा सल्ला देताना विध्वंसक होण्यापेक्षा सहनशील,विनम्र व प्रामाणिक राहिलात तसेच शिक्षणाप्रती प्रेम व शिक्षकांप्रती आदरभाव राखलात तर जीवनात निश्चितपणे यशस्वी व्हाल असा विश्वास शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी व्यक्त केला.विद्यार्थी देशातील विध्वंसक प्रवृत्ती गुन्हेगारीची पायरी ठरू शकते असा इशाराही राहू त्यांनी यावेळी दिला.
येथील विद्याधाम प्रशालेच्या ऑडिटोरियममध्ये विद्याधाम प्रशाला व शिरूरमामा न्यूज आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात ‘विद्यार्थ्यांमधील वाढती विध्वंसक प्रवृत्ती’ या विषयावर शिरूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक वाय.व्ही.जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.महिला दक्षता समितीच्या जिल्हा सदस्या शोभना पाचंगे,उपमुख्याध्यापक.पी.डी.कल्याणकर, पर्यवेक्षक बी.ए.कोकाटे,राजलक्ष्मी लकडे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमाने,पोलीस हवालदार राजेंद्र गोपाळे,प्रा.सतीश धुमाळ,प्रतीक बनकर आदी यावेळी उपस्थित होते.राऊत म्हणाले,विद्यार्थीदशेत शिक्षणाऐवजी इतर गोष्टींकडे विद्यार्थ्यांचे मन आकर्षित होत असते.अशावेळी मन ज्या गोष्टींकडे आकर्षित होत असते त्याला मुरड घालने म्हणजेच मनाविरुद्ध जगणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरते.मात्र दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही.शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे,शिक्षकांप्रती मनात आदरभाव न ठेवणे यातूनच विद्यार्थ्यांची दिशा भरकटते. चुकीच्या सवयी,चुकीची संगत, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना आपला आयकॉन मानने यातून विध्वंसक प्रवृत्ती मनात तयार होते.असे विद्यार्थी जीवनात कधीच यशस्वी होत नाही.उलटपक्षी जे विद्यार्थी शिक्षणाप्रती आस्था तसेच आई वडील व शिक्षकांप्रती आदरभाव ठेवतात,त्यांच्या विचाराने वाटचाल करतात ते नेहमीच यशस्वी होतात.
वास्तविक कायद्यानुसार वय वर्षे १८ पूर्ण झाल्यावर सज्ञान मानले जाते.मात्र आजची परिस्थिती पाहता सोशल मीडियामुळे वयाच्या बारा वर्षानंतरच मुलांना सर्वकाही ज्ञान प्राप्त होऊ लागले आहे.यामुळे मुले भरकटू लागली आहेत.ही गंभीर बाब असून विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर नको त्या गोष्टींसाठी नव्हे तर आपल्या फायद्यासाठी केला पाहिजे अशी अपेक्षा राऊत त्यांनी यावेळी व्यक्त केली. उप मुख्याध्यापक कल्याणकर यांनी स्वागत, प्रवीण गायकवाड यांनी प्रास्ताविक,एम.पी. बनकर यांनी सूत्रसंचालन तर देवळालीकर यांनी आभार मानले.