शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: येथील कुंभार आळी नवरात्रोत्सव मंडळ दरवर्षी विधवा महिलांना देवीची आरती करण्याचा मान देऊन खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाचे काम करीत आहे.याचे सर्वत्रच अनुकरण व्हायला हवे.अशी अपेक्षा तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष योगेश जामदार यांनी व्यक्त केली.
आपण प्रगतीच्या तसेच महिला. सबलीकरणाच्या कितीही गप्पा मारल्या तरी आजही विधवा महिलांना कोणत्याच धार्मिक कार्यात सहभागी करून घेतले जात नाही.अशा कार्यक्रमात त्यांचा सहभाग अपशकुन मानला जातो.अशा बुरसटलेल्या विचारांना तिलांजली देत कुंभार आळी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने स्थापनेपासूनच विधवा महिलांना देवीची आरती करण्याचा मान देण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे.ही प्रथा कायम सुरू ठेवण्याचा संकल्प या मंडळांनी केला असून याही वर्षी विधवा महिलांना निमंत्रित करून त्यांना देवीच्या आरतीचा मान देण्यात आला.पतीच्या निधनानंतर खचलेले मन आणि त्यातच समाजाचा बहिष्कार यामुळे व्यथित झालेल्या या महिलांना आरतीचा मान मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.कुंभार आळी नवरात्रोत्सव मंडळाने विधवांप्रती दाखविलेल्या संवेदना समाजातील सर्वच घटकांनी दाखविल्यास ते क्रांतीचे पाऊल ठरेल असे मत जामदार यांनी व्यक्त केले.
येथील कुंभार समाजाने २०२२ मध्ये विधवा प्रथा बंदी ठराव सर्वांनुमते मंजूर केला हा राज्यातील पहिला ठराव असावा.या ठरावामुळे वर्षभरातील सर्व सण उत्सवात व धार्मिक कार्यांमध्ये विधवा महिलांना इतर महिलांप्रमाणेच योग्य तो सन्मान दिला जातो.