वर्षअखेरपर्यंत शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होईल – प्रकाश धारीवाल

आमदार अशोक पवार यांचे मोलाचे सहकार्य

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:वाढत्या नागरीकरणाचा विचार करता नगरपरिषदेने पुढील पंचवीस वर्षाचा विचार करून वाढीव पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत ५७ कोटींचा निधी उपलब्ध होईल व या योजनेचे काम सुरू होईल असा विश्वास नगरपरिषदेचे  सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी ‘शिरूरनामाशी’ बोलताना व्यक्त केला.

धारीवाल यांनी सांगितल्यानुसार,शहराचा पाणीपुरवठा सध्या १९८५ साली बांधण्यात आलेल्या घोडनदीवरील कोल्हापूर  पद्धतीच्या बंधाऱ्यावर अवलंबून आहे. या बंधाऱ्यातून जलशुद्धीकरण केंद्रात आणलेले पाणी शुद्ध करून शहराला दररोज  ७० लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो.या बंधाऱ्यातील पाण्यासाठी नगरपरिषदेला दरवर्षी ३ रोटेशनसाठी २४ लाख रुपये मोजावे लागतात.उन्हाळ्यात नदीमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होतो.अशावेळी धरणाच्या रोटेशनची जास्त आवश्यकता भासते.नदीमधील अनेक ठिकाणचे बंधारे, बेसुमार वाळू उपशामुळे निर्माण झालेले मोठे खड्डे ओलांडत रोटेशनचे पाणी बंधाऱ्यात येते.मात्र गेल्या अनेक वर्षांची परिस्थिती पाहता या बंधाऱ्यातून शिरूर पारनेर भागातील बंधाऱ्याच्या काठावरील शेतकर्‍यांकडून होणारा मोठ्या प्रमाणावरील पाणीउपसा शहराच्या पाणीपुरवठा योजनेवर विपरीत परिणाम करीत आहे. या परिस्थितीमुळे २०१७ साली तर शहराला काही दिवस टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला.

पाणीपुरवठा समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की,बंधाऱ्यावरील पाण्यावरचे अवलंबित्व,बंधाऱ्यातून शेतकरी करीत असलेला अवैध पाणीउपसा व यातच वेगाने वाढत चाललेले नागरीकरण पाहता नवीन पाणीपुरवठा योजना गरजेची होती.याची दखल घेऊन सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला.२५ किलोमीटरहून चिंचणी धरणातून पाणी आणल्यास शिरूरची पाणीपुरवठ्याची समस्या सुटण्यास मदत होईल.अशी कल्पना धारिवाल यांनी मांडल्यानंतर या योजनेचा डीपीआर तयार करण्यात आला. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेअंतर्गत असणाऱ्या या योजनेसाठी ५७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यासाठी मागील वर्षी मार्च महिन्यात धारिवाल यांच्यासह नगराध्यक्ष वैशाली वाखारे पाणीपुरवठा समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी मुख्याधिकारी महेश रोकडे नगरसेवक संजय देशमुख यांच्या शिष्टमंडळाने पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन या योजनेला मंजुरी देण्याची मागणी केली.कोविड-१९ च्या प्रसारामुळे शासनाने(४ मे रोजी) २०२०-२०२१ च्या वित्त वर्षात कोणतीही तांत्रिक मान्यता देण्यास मनाईचे आदेश काढले होते.यामुळे शिरूरच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस मान्यता मिळू शकली नाही.

दरम्यान धारीवाल यांनी पुन्हा आमदार अशोक पवार यांची भेट घेऊन योजनेला मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.यानुसार आमदार पवार यांनी फेब्रुवारीमध्ये (२०२१)उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून या योजनेस मान्यता देण्याच्या मागणीचे पत्र दिले. शहरातील सध्याची पाणीपुरवठा व्यवस्था पाहता नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यात नगरपरिषदेला अडचण येत आहे. यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना लवकर मंजूर तसेच कार्यान्वित होणे गरजेचे असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तांत्रिक मंजुरी देण्याच्या सूचना कराव्यात अशी मागणी आमदार पवार यांनी या पत्रात केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार पवार यांच्या पत्राची दखल घेऊन ४ मे रोजीच्या शासन निर्णयातून सूट देऊन  या वाढीव पाणीपुरवठा योजनेला मान्यता द्यावी असा शेरा मारला. यामुळे या योजनेच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला असून या वर्षअखेर निधी उपलब्ध होईल.असा विश्वास कुरेशी यांनी व्यक्त केला.२५ किलोमीटरहून पाईपलाईन द्वारे पाणी शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्पात आणले जाणार आहे. पाईपलाईन द्वारे हे पाणी आणले जाणार असल्याने आधीच स्वच्छ असलेल्या या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केल्यानंतर आधी पेक्षा जास्त शुद्ध पाणी नागरिकांना मिळू शकणार आहे.धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन वर्षापासून नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक या योजनेचा पाठपुरावा करीत असून आमदार पवार यांच्या अथक प्रयत्नातून या योजनेला यश मिळत असल्याचे मनस्वी समाधान आहे अशी प्रतिक्रिया सभापती कुरेशी यांनी दिली.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेअंतर्गत घोड जलाशयातून पाणी आरक्षण मंजुरीसाठी नगरपरिषदेने प्रस्ताव दिला असून लवकरच यास मंजुरी मिळेल असे कुरेशी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.