शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: एकेकाळी गावातील तंटे मिटवणारा म्हणजेच तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठेचे पद भूषवलेला दत्ता गाडे अचानक गुन्हेगार बनला. पुढे गुन्हेगारीचे अनेक क्रूर कृत्य त्याने केले.मात्र स्वारगेट बस स्थानकात तरुणीचा बलात्कार करून त्याने क्रौर्याची सीमा गाठली आणि अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
स्वारगेट एस टी बसस्थानक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दत्ता गाडे अखेर रात्री पोलिसांच्या जाळ्यात अडकला.२०१८ सालापर्यंत गाडेचे आयुष्य सरळ आणि सोपे होते. गाडे याचे गुनाट येथे साधे घर असून आई वडील शेती करतात.भाऊ कंपनीत कामास आहे.गाडे विवाहित असून त्याला सात वर्षाचा मुलगा आहे.गावातील शाळेतच त्याने दहावीचे शिक्षण घेतले.२०१८ साली त्याने गावाचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपद मिळवले. तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपद हे तसे प्रतिष्ठेचे पद आहे. कारण गावातील तंटे या समिती समोर येतात. गावातील ग्रामस्थांचे वाद पोलिसांपर्यंत जाऊ न देता ते गावात सोडवण्याचे मोठे काम तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून केले जाते.अशा समितीचा प्रमुख म्हणून काम केलेला माणूस अचानक गुन्हेगारीकडे वळतो.हे तसे अनाकलनीय आहे.२०१९ मध्ये त्याने पुन्हा तंटामुक्ती समितीची निवडणूक लढवली.मात्र त्यात पराभूत झाला.याच वर्षात त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती त्याने केलेल्या गुन्ह्यामुळे.२०१९ मध्ये एका गुन्ह्यात शिरूर पोलिसांनी त्याच्याकडून १० लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला होता.त्यानंतर त्याच्या अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात वाढ होत गेली.शिरूर शहरात त्याचा कायम वावर असायचा.एसटी बस स्थानकात तो तासनतास बसलेला असायचा.स्वारगेट बस स्थानकात एका बसमध्ये त्याने तरुणीवर बलात्कार केल्याने राज्यभर त्याचे पडसाद उमटले. पोलिसांवर दबाव वाढला. अखेर पोलिसांनी शोधमोहीम अविरतपणे सुरू ठेवून अखेर त्यास जेरबंद करण्यात यश मिळवले.
गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे सख्खा भाऊ देखील करत नव्हता संवाद
गुन्हा केल्याच्या दुसऱ्या दिवशी गाडे गावात होता… पोलिसांना गावात त्याचे लोकेशन मिळाल्याने पोलिस थेट घरी गेले होते. तिथे भाऊ.आई वडील घरात होते…. पोलिसांनी त्याच्या भावाला कॉल करण्यास सांगितले. भावाने त्याला कॉल केला व म्हणाला,आईचा अपघात झालाय लवकर घरी ये.. नऊ महिन्यापूर्वी गाडेचे भावाशी कॉलवर संभाषण झाले होते. त्यामुळे अचानक भावाचा कॉल आल्याने गाडेला संशय आला व तो तेथून पसार झाला होता. त्याच्याकडे दुचाकी वा चार चाकी वाहन नसल्याने तो गावाच्या परिसरातच भटकत राहिला.अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.