शिरूर:राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून शहराच्या स्वच्छतेसाठी दररोज झटणाऱ्या स्वच्छता महिला कामगारांच्या हस्ते भारतीय पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.आमच्या स्वच्छता भगिनींना प्रकाशनाचा मान देऊन भारतीय पत्रकार संघाने खऱ्या अर्थाने जिजाऊंना आदरांजली अर्पण केली अशा भावना या महिलांच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.
भारतीय पत्रकार संघाच्या शिरूर शाखेच्या वतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यासाठी सर्वसामान्य मात्र सामाजिक दृष्ट्या तितकेच महत्त्वाचे असणाऱ्या महिलांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.खरे तर कोणतेही कामं छोटे वा मोठे नसते.दररोज हातात झाडू घेऊन शहर स्वच्छ करणारे कर्मचारी हे देखील समाचाचा मुख्य घटक आहे.मात्र समाज तसे मानताना दिसत नाही.दिनदर्शिकेचे प्रकाशन असो अथवा इतर कोणताही कार्यक्रम असो प्रत्येक जण मोठे पदाधिकारी,प्रशासकीय अधिकारी यांनाच महत्त्व देण्याचा प्रयत्न करतात.हे वास्तव आहे.आरोग्य निरीक्षक दत्तात्रय बर्गे यांच्याकडे स्वच्छता विभागाच्या महिला कामगारांच्या हस्ते प्रकाशन करण्याचा मानस व्यक्त केला असता त्यांनी त्यास आनंदाने होकार दिला.दुग्धशर्करा योग म्हणजे जिजाऊ जयंती निमित्त या महिलांना हा मान मिळाला.दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्याचा मान मिळाल्याचा एक वेगळाच आनंद सर्व महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला.
स्वच्छता विभागाचे मुकादम मनोज अहिरे,केतन जाधव यांनी यावेळी कृतज्ञ भावना व्यक्त केली. कोणतेही काम छोटे वा मोठे नसते.त्यातील भावना महत्वाची असते.आमच्या स्वच्छता भगिनी या जिजाऊंच्या लेकी असून त्यांना दिनदर्शिका प्रकाशनाचा मान देऊन भारतीय पत्रकार संघाने खऱ्या अर्थाने जिजाऊंना आदरांजली अर्पण केली अशा भावना सर्व महिलांच्या वतीने या दोघांनी व्यक्त केल्या.
.