श्रेयवादासाठी आटापिटा करण्यापेक्षा घोडगंगाच्या कामगारांना न्याय द्या  – सोनवणे

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: श्रेयवादासाठी आटापिटा करण्यापेक्षा मरणासन्न अवस्थेतील रावसाहेबदादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करून आंदोलनकर्त्या कामगारांना न्याय द्यावा.असा टोला भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी आमदार अशोक पवार यांना पत्रकार परिषदेत लगावला.तालुक्यातील पूर्व भागात पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत असणाऱ्या कामांचे खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांनी केलेले उद्घाटन हे राजशिष्टाचारानुसार नसून अनधिकृतपणे केलेले हे कार्यक्रम जनतेची दिशाभूल व फसवणूक करणारे असल्याचे सोनवणे म्हणाले.
           तालुक्यातील पूर्व भागातील निर्वी,कोळगाव, मांडवगण व कोहकडेवाडी या या गावांमध्ये खासदार कोल्हे व आमदार पवार यांच्या हस्ते पंतप्रधान सडक योजनेतील रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग व जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकानुसार कोणत्याही नियम व मुद्द्यांचे पालन  करण्यात आलेले नाही.हा कार्यक्रम घेण्यासाठी पालकमंत्री कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक असताना घेण्यात आलेली नाही.अशाप्रकारची परवानगी नसताना अशा कार्यक्रमांना शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये असे संकेत असतानाही सचिन तापकीर व कुलकर्णी हे अधिकारी कार्यक्रमास उपस्थित राहिले.कामाची वर्कऑर्डर नसताना ठेकेदारही उपस्थित राहिले. निमंत्रण पत्रिका,कोनशीला तसेच वर्तमानपत्रातील जाहिरातींमध्ये पालकमंत्री व जिल्ह्यातील इतर मंत्र्यांचा उल्लेख करण्यात आला नसल्याचे सोनवणे यांनी सांगितले.अशा या अनधिकृत कार्यक्रमाच्या आयोजनात दोषी असणाऱ्या लोकप्रतिनिधी अधिकारी व ठेकेंदारावर कारवाई करण्याची मागणी केल्याचे सांगताना पंतप्रधान पालकमंत्री यांचा नामोल्लेख टाळून तसेच विनापरवाना कार्यक्रम आयोजित केल्यास तो उधळून लावू असा इशारा सोनवणे यांनी यावेळी दिला.
पंतप्रधान सडक योजनेचे वरिष्ठ अधिकारी कुलकर्णी हे कोळगाव येथील भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित होते.असे असतानाही त्यांनी तालुक्यात भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला नसल्याचे सोनवणे यांना लेखी स्वरूपात कळविले हे विशेष.

Leave A Reply

Your email address will not be published.