शिरूर:शिवजयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने १५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी’ स्व.धनराज नहार स्मृति व्याख्यानमालेचे ‘आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे समन्वयक ओमप्रकाश सतिजा यांनी दिली.व्याख्यानमालेचे यंदाचे २८ वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध विचारवंतांचे विचार ग्रहण करण्याची संधी शिरूरकरांना मिळणार आहे.
येथील साई गार्डन मंगल कार्यालयात दररोज संध्याकाळी पावणे सात वाजता व्याख्यानमालेची सुरुवात होणार असून’ न्यायव्यवस्था सद्यस्थिती व आव्हाने ‘या विषयावर माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी हे पहिले पुष्प गुंफणार आहेत.१६ फेब्रू, ला ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा भारतीय राजकारणावर झालेला परिणाम ‘या विषयावर इतिहास संशोधक व ज्येष्ठ पत्रकार अशोक कुमार पांडेय,१७ फेब्रु ला ‘लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही संविधानिक जबाबदारी आणि वास्तव ‘या विषयावर माजी मुख्य सचिव महेश झगडे, १८ फेब्रु ला ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन शास्त्र ‘या विषयावर इतिहास संशोधक व व्यवस्थापन मार्गदर्शक डॉ.अजित आपटे तर १९ फेब्रुवारी ला ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एकूण लेखन ‘या विषयावर प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान होणार असल्याचे सतिजा यांनी सांगितले.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी शिवसेवा मंडळाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिवादन सोहळा पार पडणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे समाजकारण राजकारण, स्वराज्य उभारण्यासाठी दिलेला लढा, एकूणच त्यांच्या उत्तुंग कार्याचा इतिहास समाजापर्यंत पोहोचावा या उदात्त हेतूने २८ वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीने व्याख्यानमालेची सुरुवात केली.राज्य,परराज्यातील विविध विचारवंतांनी आपल्या व्याख्यानमालेतून उच्च कोटीचे विचार मांडले.हा विचारांचा ठेवा शिरूरकरांनी कदाचित जतन केला असावा व इथून पुढेही करतील अशी आशा व्यक्त करताना समितीचे प्रमुख रवींद्र धनक यांनी प्रत्येक शिरूरकराने उपस्थित राहून व्याख्यानमालेतील अमूल्य विचारांच्या ठेव्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन केले आहे.