शिरूर:मंत्रालयातील कार्यसन अधिकारी प्रवीण शिशुपाल यांची आई व सासू यांच्या स्मृती दिनानिमित्त येथील प्रवीण शिशुपाल सोशल फाऊंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज सय्यद यांनी दिली.
शनिवारी (दि.१५ फेब्रुवारी ) येथील नगरपरिषद मंगल कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळात आयोजित आरोग्य शिबिराचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शिवव्याख्याते अमोल मिटकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.रुबी हॉल रक्तपेढी व डॉ मनोहर डोळे फाउंडेशन यांचे सहकार्य या शिबिराला लाभणार असून या शिबिरात सर्व रोग निदान, मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू उपचार व शस्त्रक्रिया या बाबींचा समावेश असल्याचे सय्यद यांनी सांगितले.रुग्णांना मोफत गोळ्या,औषधे,नंबरचे चष्मे तसेच प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र, स्मरणचिन्ह व भेटवस्तू दिली जाणार असल्याचेही सय्यद यांनी सांगितले.
मंत्रालयात समाजकल्याण विभागात कार्यसन अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रवीण शिशुपाल यांच्या मातोश्री रंजना विलास शिशुपाल व सासूबाई अलका बाबासाहेब साबळे यांचे तीन वर्षापूर्वी एकाच दिवशी निधन झाले होते.त्यांच्या स्मरणार्थ शिशुपाल फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करीत असून त्याच भावनेतून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सय्यद यांनी सांगितले.जिथे जन्मलो,शिकलो,वाढलो त्या भूमीचे आपण काही देणे लागतो ही भावना माझ्या मनात असून या भूमीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपण्याचा निश्चय केल्याचे प्रवीण शिशुपाल यांनी सांगितले.नगरसेवक विनोद भालेराव, ॲड स्वप्नील माळवे,विलास शिशुपाल,रुस्तुम सय्यद,अबरार सय्यद,प्रशांत शिशुपाल,शकुर सय्यद आदी यावेळी उपस्थित होते.