शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटकांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी या हेतूने शासनाने तालुकास्तरावर ग्रामीण आरोग्य रुग्णालय सुरू केली.मात्र शिरूर ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती पाहता असूविधेच्या गर्तेत असणाऱ्या असणारे हे रुग्णालय कायमच ‘व्हेंटिलेटर’ असतेकी काय असा प्रश्न पडतो.
दारिद्र्य रेषेखालील घटक,तसेचआर्थिक दुर्बल घटकांना खाजगी आरोग्य सेवेचा खर्च परवडणारा नाही.असे घटक आरोग्य सेवेपासून वंचित राहू नयेत म्हणून शासनाने खरेतर तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य सेवा केंद्रांची निर्मिती केली. शिरुर तालुक्यातही ग्रामीण रुग्णालयाची सार्वजनिक आरोग्य केंद्र आहेत.तालुक्याचे ठिकाण असलेल्या शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा नेहमीच असुविधेच्या गर्तेत असल्याचे दिसून येते.पाच वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत बांधण्यात आली.नवीन इमारत बांधण्यापूर्वी जुन्या इमारतीमध्ये तर अतिशय विदारक असे या रुग्णालयातील आरोग्य सेवेचे चित्र होते.ओपीडी सेवा सोडल्यास इतर सुविधांचा लाभ रुग्णांना मिळत नव्हता.(नवीन इमारतींमध्येही काही स्वरूपात अशीच परिस्थिती आहे.)ज्या खोलीमध्ये महिलांची प्रसूती केली जात होती.त्या खोलीचीही प्रचंड दुरावस्था होती. खिडकीच्या फुटलेल्या काचा तुटलेले दरवाजे यामुळे महिलांची गळचेपी होत होती.या विदारक चित्राला वाचा फोडल्यानंतर त्यावेळेस डागडुजी करण्यात आली. उदाहरणादाखल ही एक घटना आहे.इतरही अनेक समस्या त्यावेळी होत्या.नवीन इमारत झाल्यानंतर तरी समस्या सुटतील अशी अपेक्षा होती.नवीन इमारतीमध्ये ३० बेडचे कक्ष उभारण्यात आले.मात्र रुग्णांना सतत रेफर करण्याच्या सवयीमुळे या बेडचा हवा तितका फायदा रुग्णांना कधीच मिळतना दिसत नाही.
एक्स-रे ची रूम तळमजल्यावर असणे,तसेच क्ष-किरणे बाहेर पडू नये म्हणून ज्या उपाययोजना करायच्या होत्या, त्यादेखील करण्यात आल्या नव्हत्या.नवी इमारत असतानाही सुरुवातीची काही वर्षे कॅज्युअल्टी कक्ष हा जिन्याखाली होता.ऑपरेशन थिएटरही बंदावस्थेत होते.इमारतीच्या आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य होते.याबाबतही वाचा फोडल्यानंतर एक्स-रे रूम तळमजल्यावर हलविण्यात आले.कॅज्युअल्टी कक्ष एका खोलीत सुरू करण्यात आला. सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली.तसेच ऑपरेशन थिएटरही कार्यान्वित करण्यात आले.या रुग्णालयात सोनोग्राफी मशीन असूनही सोनोग्राफी सेवा रुग्णांना मिळत नाही.वैद्यकीय कचरा विल्हेवाट लावण्याची यंत्रणा आहे.मात्र ती बंदावस्थेत दोन व्हेंटिलेटर आहेत,मात्र लागणारा तांत्रिक स्टाफ नसल्याने पडून आहेत.गेली तीन वर्षापासून या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त आहे.वैद्यकीय अधिकारीच हे पद सांभाळत आहेत.आजच्या तारखेला तर हा पदभार कोणाकडेच नसल्याचे वास्तव आहे.गेली वर्षभर डॉ. तुषार पाटील यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षकाचा पदभार होता.मागील महिन्यात त्यांनी राजीनामा दिला.त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही.म्हणून ते वैद्यकीय अधिकारी म्हणून पुन्हा रुजू झाले. वैद्यकीय अधीक्षकाच्या रिक्त पदाबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर यांच्याशी शिरूरनामाने संपर्क साधला होता.यानंतर काही दिवसातच शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिकेकडे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला.मात्र गेली दोन आठवडे उलटूनही त्यांनी हा पदभार स्वीकारलेला नाही.या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तीन जागा आहेत.सध्या मात्र केवळ एकच वैद्यकीय अधिकारी या रुग्णालयात कार्यरत आहेत. शिरूरनामाच्या पाठपुराव्यानंतर मागील वर्षी या रुग्णालयात कोविड आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले.सध्या अँटीजेन तसेच आर टी पी सी आर टेस्टही या रुग्णालयात केली जात आहे. सध्या जरी रुग्णसंख्या रोडावली असली तसेच कोरोना चाचण्या बंद असल्या तरी तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता वैद्यकीय अधीक्षक रुजू होणे तसेच पूर्णक्षमतेने वैद्यकीय अधिकारी कार्यरत होणे आवश्यक दिसते.
इतकी विदारक परिस्थिती असतानाही सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेचे केंद्र असणाऱ्या या ग्रामीण रुग्णालयकडे कोणाचेच गांभीर्याने लक्ष नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे.केवळ इमारत देखणी असून उपयोग नाही,तर इमारतीमध्ये अपेक्षित असणारी सेवा ही महत्त्वाची आहे.हे समजून घेणे गरजेचे आहे.खरेतर येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू होणे गरजेचे आहे.