शिरुर शहरात ‘एस आर ए’ अंतर्गत झोपडपट्टी परिसर विकासाचा प्रयत्न- आमदार अशोक पवार

  शहरात तालुका क्रीडांगण तसेच नदी सुधार योजना राबविण्याचा मानस

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:शिरुर नगर परिषद हद्दीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अंतर्गत (एस आर ए) झोपडपट्टी परिसराचा विकास  करण्याचा आपला मनोदय असून शासनाने यास परवानगी द्यावी यासाठी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलून धरणार असल्याचे आमदार अशोक पवार यांनी ‘शिरूरनामा’शी बोलताना सांगितले.शहरात नगरपरिषदेच्या सहकार्याने तालुका क्रीडांगण व्हावे तसेच नदी सुधार प्रकल्पांतर्गत शहरातून जाणाऱ्या घोडनदीचा काठ सुशोभित करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही आमदार पवार यांनी सांगितले.

          आमदार पवार म्हणाले,सध्या फक्त मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये (महानगरपालिका हद्दीत) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एस आर ए)अंतर्गत झोपडपट्टी परिसराचा विकास केला जात असून झोपडपट्टीवासीयांना यातून पक्की घरं मिळत आहेत.नगरपरिषद हद्दीत एस आर ए योजना राबविली जावी असा आपला आग्रह आहे.ही अतिशय चांगली योजना असून शिरुर नगर परिषद हद्दीत असणाऱ्या झोपडपट्टी परिसरात एस आर ए योजना राबविल्यास शहराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. ज्या भागात झोपडपट्टी विस्तारलेली आहे. त्यातील काही भागात पाच ते सहा मजली टॉवर उभारणे शक्य असून उर्वरित जागेत शाळा,क्रीडांगण,दवाखाने विकसित करता येणार आहे.यातून शहर झोपडपट्टीमुक्त होईलच मात्र झोपडपट्टीवासीयांना पक्क्या घराबरोबरच उर्वरित जागेत विकसित केलेल्या शाळा तसेच आरोग्यसेवेचा लाभ मिळणार आहे. शिरूर नगरपरिषद हद्दीत शासनाने एस आर ए च्या योजनेला मंजुरी द्यावी यासाठी प्रयत्नशील असून उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.आमदार पवार म्हणाले,नगरपरिषदेला विश्वासात घेऊन शिरूर शहरात तालुका क्रीडांगण उभारण्याचा आपला मनोदय असून  नगरपरिषदेने यात पुढाकार घेतल्यास क्रीडांगणाच्या बाहेरील बाजूस शॉपिंग मॉलचे नियोजन करता येणार आहे.यातून नगरपरिषदेस उत्पन्न मिळेल.तसेच यातून क्रीडांगणाच्या मेन्टेनन्सचा खर्च भागविणेही शक्य होणार आहे.
          नदी सुधार प्रकल्पअंतर्गत शहरातील घोडनदीचा काठ सुशोभित करण्यासाठी आमदार पवार यांचा प्रयत्न असून या उपक्रमाबरोबरच एस आर ए व तालुका क्रीडांगण आदी मुद्दे अधिवेशनात उचलून धरणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.या तीनही योजना शिरुर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या असून या योजना मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे.असे आमदार पवार यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.