शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: शहरामध्ये गेल्या आठवडाभरात अठ्ठेचाळीस कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांचा आकडा पाहता नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
शहरात सध्याची परिस्थिती पाहता, कोरोना हद्दपार झाला असे समजून नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे तसेच सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळत नसल्याचे चित्र आहे.शासनाने टप्प्याटप्प्याने लॉक डाऊन शिथील केले. शासनाच्या शेवटच्या घोषणेनंतरची परिस्थिती पाहता, नागरिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. दीपावलीच्या सणावेळी बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी दिसून आली. त्या कालावधीत बऱ्यापैकी मास्कचा वापर होता. त्यानंतर मात्र हळूहळू मास्कचा वापर कमी होत गेला. गेल्या महिन्याभरापासून मास्क वापरणाऱ्यांच्या संख्येमध्ये प्रचंड घट होतानाचे दुर्दैवी चित्र आहे.सध्याचे वास्तव पाहता, जवळपास सत्तर टक्के नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे दिसून येत आहे.सोशल डिस्टंसिंगचातर पूर्ण फज्जा उडाल्याचे पहावयास मिळत आहे.
मास्कचा वापर होत नसल्याने तसेच सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळला जात नसल्याने शहरात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या आठवडाभरात शहरांमध्ये अठ्ठेचाळीस कोणाचे रुग्ण आढळून आले आहेत. आज मितिला त्रेचालीस रुग्ण उपचार घेत आहेत. ही शहराच्या दृष्टीने धोक्याची घंटा असून कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. आतापर्यंत शहरात ७८२ रुग्ण आढळून आले आहेत. यात वीस जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना हद्दपार झालेला नसून नागरिकांनी मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टंसिंगचे नियम गांभीर्याने पाळावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.