शिरूर शहरात १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याची सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची मागणी

१०० ऑक्सिजन १० व्हेंटिलेटर वेड अपेक्षित

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

 

शिरूर: शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या व तुलनेने उपलब्ध असलेली उपचार यंत्रणा तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन शिरूर शहरात १०० ऑक्सीजन व १० व्हेंटिलेटर बेडची रूग्णालय सुरू करावे अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

          शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी,शिवसेनेचे जिल्हा संघटक संजय देशमुख, समन्वयक कैलास भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण आंबेकर व शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष रवींद्र खांडरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे १०० ऑक्सिजन व १० व्हेंटिलेटर रुग्णालय सुरू करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या निवेदनानुसार,फेब्रुवारी महिन्यापासून देशभर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. शिरूर शहरही यास अपवाद नसून शहरात सरासरी महिन्याला पाचशे ते सातशे रुग्ण आढळून येत आहेत.वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत शहरातील उपचार यंत्रणा ही अत्यंत मर्यादित अशी आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध कोविड केअर सेंटर पुरेसे आहे. मात्र शहरात फक्त तीस ऑक्सिजन बेडचे शासकीय रुग्णालय आहे.शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण मिळून सुमारे१००ऑक्सिजन तर १० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत.शिरूर शहर हे शिरूर तालुक्यासह श्रीगोंदा व पारनेर तालुक्याची बाजारपेठ असल्याने या तिन्ही तालुक्यातील कोरोना रुग्ण या खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत.परिणामी शहरातील रुग्णांना ऑक्सीजन व्हेटीलेटर बेड मिळणे दुरापास्त झाले आहे.गेल्या चार महिन्यांतील परिस्थिती पाहता मर्यादित ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडमुळे शहरातील अनेक रुग्णांना बेड अभावी आपले प्राण गमवावे लागले आहेत. मोलमजुरी करणाऱ्या तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांची कथा तर काही औरच.या स्तरातील रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने ऑक्सीजन तसेच व्हेंटिलेटर बेडअभावी अशा रुग्णांनाही मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.
           शहरातील सध्याची अशा प्रकारची वैद्यकीय उपचार व्यवस्था पाहता येणारा काळ हा आव्हानात्मक असणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. भविष्यातील हा धोका पाहता शहरात वैद्यकीय उपचार यंत्रणा मजबूत करणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून शहरात १०० ऑक्सीजन बेड व १० व्हेंटिलेटर बेडचे रुग्णालय सुरू होणे अत्यावश्यक आहे. याचा गांभीर्याने विचार करून सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना असे रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आल्याचे शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितले. हे रुग्णालय सुरू करण्यासाठी शासनाच्या अधिपत्याखालील संस्थांच्या निधीचा वापर करावा अशी विनंती करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.