शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध झालेल्या निधीमधून शहरातील विविध भागात एलईडी दिवे उभारण्यात येणार असून यामुळे शिरूर शहर या दिव्यांनी उजळणार आहे.यासाठी पावणे दोन कोटींचा निधी उपलब्ध झाला असून या कामांची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली आहे.
शहरातील विविध भागात एलईडी दिवे उभारण्यासाठी तसेच इतर कामासाठी सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या वतीने आमदार अशोक पवार यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती. या कामांसाठी आमदार पवार यांनी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आग्रह धरला होता. उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एलईडी दिव्यांसाठी एक कोटी ८६ लाख८९ हजार ६१२ रुपये तर इतर कामांसाठी ६५ लाख रुपये मंजूर केले.असा अडीच कोटींचा(२ कोटी ५१ लाख ९२ हजार ८७२ रुपये) निधी नगरपरिषदेस उपलब्ध झाला आहे.शहरातील बीजे कॉर्नर ते सिटी बोरा कॉलेज,निर्माण प्लाझा ते एसटी कॉलनी, टेलिफोन भवन सर्विस रोड ते घोडोबा मंदिर,इंदिरा गांधी पुतळा ते तिरंगा फ्लेक्स,एसटी बस स्थानक ते सतरा कमानी पूल,शनी मंदिर ते दशक्रिया घाट,अंडे बाजार ते एसटीपी प्लांट,पाबळ फाटा ते मोती नाला,अग्निशमन केंद्र ते सर्टिफाइड स्कूल अशा विविध भागात स्टेट एलईडी दिवे उभारण्यात येणार असून हा भाग या दिव्यांनी उजळणार आहे.
या कामांबरोबरच प्रभाग क्रमांक दोन मध्ये ढोर आळी रस्ता ते जाधव यांच्या घरापर्यंत भुयारी गटार काम, नगरपरिषद शाळा क्रमांक ७ च्या मागील बाजूस ढोरआळी येथे पावसाळी गटार काम,डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या नगर रस्ता बाजूच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम,प्रभाग क्रमांक चार येथे आदिनाथ नगर खारामळा शेजारील नाल्याचे सुशोभीकरण आदी कामे या निधीतून केली जाणार आहेत. सभागृहनेते धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून आमदार पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.आमदार पवार यांनी यात जातीने लक्ष घालून निधी मिळवून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.आमदार पवार यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या कामांना निधी उपलब्ध झाल्याचे पाणीपुरवठा व विद्युत समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी यांनी सांगितले.विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे हे आमदार पवार यांचे एक प्रकारचे कौशल्य असून यामुळे विकासकामांना गती मिळत आहे.आमदार पवार व सभागृह नेते धारिवाल हे विकासाचे एक सुंदर समीकरण असल्याचे कुरेशी म्हणाले.