शिरूर: तालुका रेड झोन म्हणून जाहीर झाला असला तरी शिरूर शहरात मात्र एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याचे वास्तव आहे. नागरिक विनाकारण घराबाहेर पडू नये म्हणून नगरपरिषदेचे कर्मचारी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना फिरण्यास मज्जाव करताना दिसून आले.
तालुक्यात शिक्रापूर येथे एक व तळेगांव ढमढेरे येथे एक अशा दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर शिक्रापूर, तळेगांव ढमढेरे व सणसवाडी या तीनही भागात एकूण सात जण कोरोना बाधित रुग्ण आहेत. यामुळे तालुका रेड झोन म्हणून जाहीर झाला. तालुका रेड झोन मध्ये गेला असलातरी शिरूर शहर मात्र अद्याप कोरोना मुक्त आहे. नगर परिषदेने शहरामध्ये येणारे रस्ते बॅरिकेड लावून बंद केले.शहरात येण्यासाठी केवळ सतराकमानी पूलाच्या जवळील बाह्यवळण मार्गाचा पर्याय ठेवला. पांजरपोळ संस्थेसमोर शहरातून जाणाऱ्या नगर पुणे रस्त्यावर पोलिसांचा चेक नाका लावला.याचा परिणाम बाहेरगांवाहून येणाऱ्या वाहनांना तसेच परगांवाच्या नागरिकांना शहरात येण्यास मज्जाव करण्यात आला.यामुळे बाहेरून बाधित होऊन आलेल्यांचा धोका टळला.बाहेरगांवाहून आलेल्या शहरातील नागरिकांना होम क्वारंटाझ्न करण्यात आले.नगर परिषदेने वेळोवेळी जनता कर्फ्यूचे अंमलबजावणी केली, धूूरळणी, फवारणी केली.या सर्व प्रयत्नांंमुळे शहर कोरोनामुक्त राहू शकले.
राज्य शासनाने नियमांच्या चौकटीत काही दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली.मात्र त्यानंतरही शहरातील अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता एकाही व्यावसायिकाने दुकान सुरु केले नाही.नगर परिषदेने आज ठरल्याप्रमाणे जनता कर्फ्यूची अंमलबजावणी केली.येथील निर्माण प्लाझा चौकात नगरपरिषद आरोग्य विभागाचे कर्मचारी बंद असताना रस्त्यावर फिरणाऱ्या
नागरिकांना फिरण्यास मज्जाव करताना व त्यांना घरी जाण्यास सांगताना दिसून आले. बुधवार व रविवार या आठवड्यातील दोन दिवशी जनता कर्फ्यूची अंमलबजावणी शहरात केली जात असून लॉकडॉऊन असेपर्यंत याप्रकारे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगीतले. शहर कोरोनामुक्त असलेतरी नागरिकांनी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करावा,अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त घराबाहेर पडू नये,बाहेर पडताना मास्कचा, सॅनिटायजरचा वापर करावा असे आवाहन रोकडे यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातून पोलिस गायब झाल्याचे दिसून येत आहे.नगरपरिषदेने बॅरिकेडिंग केलेल्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र सध्या त्या पॉईंटसवर पोलिस दिसून येत नाहीत. यामुळे नागरिकांचा संचार वाढल्याचे चित्र आहे. आज जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करताना नगरपरिषदेला आपले कर्मचारी रस्त्यावर उतरावे लागले.