शिरूरमध्ये लस आहे पण लाभार्थी नाहीत

लसीकरण केंद्र लाभार्थ्यांची वाट पाहत आहे

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: देशात सर्व ठिकाणी लसीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा असल्याच्या तक्रारीदेखील आहेत. शिरूर शहरात मात्र लस उपलब्ध आहे मात्र लाभार्थीच नाहीत.अशी विचित्र परिस्थिती आहे. शहरात लसीकरण सुरू झाल्यापासून पाच हजाराच्या वर नागरिकांनी लस घेतली आहे.मात्र कालपासून लसीकरण केंद्रावर लाभार्थी रोडावले असून ४५ वर्ष वयोगटापुढील नागरिकांनी लसीकरण याचा लाभ घ्यावा,असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तुषार पाटील यांनी केले आहे.

          महाराष्ट्रमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना लसीकरण मोहीम वेगाने राबवली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. गेल्या पंधरवड्यातील परिस्थिती पाहता पुणे शहरासह राज्याच्या अनेक भागात लसीचा तुटवडा असल्याचे चित्र होते.अशा परिस्थितीत राज्याला जास्तीत जास्त लस मिळावी म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील आहे.अजूनही बऱ्याच ठिकाणी लशीचा तुटवडा जाणवत आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना शिरूर मधील लसीकरण केंद्रावर कालपासून लाभार्थी रोडावल्या चित्र आहे.आज या लसीकरण केंद्राला ३५० लशी उपलब्ध झाल्या. सकाळी ३५० लाभार्थ्यांनी टोकण घेतले. मात्र प्रत्यक्षात २५० लाभार्थ्यांनी लस घेतली. त्यामुळे केंद्रावरील कर्मचाऱ्यांना लाभार्थ्यांची वाट पाहण्याची वेळ आली. हे चित्र पाहून वैद्यकीय अधीक्षक पाटील यांनी ४५ वर्ष वयोगटापुढील नागरिकांनी लस घेण्यासाठी केंद्रावर यावे असे आवाहन केले. लसीकरण मोहीम येथे सुरू झाली. तेव्हा पहिल्याच दिवशी उपलब्ध झालेल्या १५० लशी संपल्या. अनेक नागरिकांना लस संपल्यामुळे घरी परतावे लागले होते. तीन दिवसांनी लस उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. परवापर्यंत नागरिकांचा प्रतिसाद मिळत होता. लसीकरण सुरू झाल्यापासून आजपर्यंत पाच हजाराहून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र कालपासून लस शिल्लक राहत असल्याचे चित्र आहे. सुदैवाने आपल्या लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.