शिरूर हवेली मतदारसंघात भाजपा युती धर्म पाळणार का?

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

प्रवीण गायकवाड

शिरूर: महायुतीमध्ये शिरूर हवेली मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्याने शिरूर हवेली भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून कुठे राजीनामे तर कुठे बंडाची भाषा ऐकावयास मिळत आहे.अशा परिस्थितीत भाजप युती धर्म पाळणार का?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

         शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आमदार अशोक पवार यांची उमेदवारी निश्चित होती.गेली दोन पंचवार्षिक एकत्रित राष्ट्रवादीच्या वतीने उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे यावेळी  महायुतीचे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.मागील निवडणुकीत राष्ट्रवादी एकत्र असताना कंद यांना उमेदवारी देण्याची अजित पवार यांची इच्छा होती.मात्र ऐनवेळी साहेबांमुळे अशोक पवार यांनाच उमेदवारी देण्यात आली.त्या निवडणुकीनंतर कंद हे भाजपात गेले.राष्ट्रवादीमध्ये बंड  केल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार हे महायुतीमध्ये  सहभागी झाले.यामुळे यावेळी कंद हे भाजपातून अथवा दादांच्या राष्ट्रवादीत दाखल होऊन महायुतीचे उमेदवार असतील अशीच चर्चा होती.मात्र गेल्या काही महिन्यातील परिस्थिती पाहता कंद हे उमेदवारी मिळवण्यासाठी हवे तितके सक्रिय दिसले नाही. मतदारसंघातही त्यांची सक्रियता दिसली नाही. पवार यांच्यासमोर कंद टिकणार नाहीत.अशा चर्चानाही जोर धरला.यातच राष्ट्रवादीच्या वतीने माऊली कटके यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कंद यांनी पत्रकार परिषद घेऊन लवकरच पुढील भूमिका जाहीर करू असे स्पष्ट करत निर्धार मेळाव्याचे आयोजन केले.या निर्धार मेळाव्यात ते आपले भूमिका जाहीर करणार आहेत.त्यांचा हा मेळावा प्रेशर टॅक्टिज आहे की खरोखर बंड आहे.यात स्पष्ट होईलच.
          महायुतीतील जागावाटप हे तिन्ही पक्षाच्या सर्व सहमतीने झाल्याचे महायुतीतील वरिष्ठ पदाधिकारी सांगत आहेत.अशात ज्या ज्या मतदारसंघात महायुतीने जे जे उमेदवार दिले आहेत तेथे युतीचा धर्म पाळून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी तेथील तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आहे. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता,मावळ मध्ये सुनील शेळके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन उघड नाराजी व्यक्त केली. तर शिरूर हवेली मतदार संघात राष्ट्रवादीने कटके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कंद यांनीही उघड नाराजी व्यक्त केली.भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला आहे.यामुळे शिरूर हवेली
मतदारसंघात पेच निर्माण झाला आहे.
           १९९९ साली राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे रूपाने दोन वेळा भाजपला संधी मिळाली.एकूणच भाजपचे या मतदारसंघातील महत्त्व अधोरेखित करते.या निवडणुकीत महायुतीला भाजपची प्रामाणिक साथ त्यांना या मतदार संघात विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावू शकते.भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नाराजी अथवा बंड करणे हे महायुतीच्या या मतदारसंघातील उमेदवारासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.याकडे पक्षाचे प्रमुख नेते लक्ष देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Leave A Reply

Your email address will not be published.