शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांनी प्रचाराचा जो पॅटर्न राबविला होता त्याचा त्यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा होता. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांनी हाच पॅटर्न अवलंबल्याचे चित्र आहे.त्याचा त्यांना किती लाभ होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
लोकसभा निवडणुकीवेळी खासदार सुजय विखे यांच्या विरोधात निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा लंके हे विखे यांच्यासमोर टिकतील का अशी चर्चा होती. प्रस्थापित तसेच ‘अर्थ ‘पूर्ण नियोजना सहित सर्वच बाबतीत विखे हे लंके यांच्या पेक्षा सरस होते. त्यामुळे यावेळी ही विखेच बाजी मारतील असा सगळ्यांचाच कयास होता.साधी राहणी,साधे वागणे,ग्रामीण बाज आणि समोरच्याच्या हृदयात घुसण्याची कला यामुळे हळूहळू लंके यांच्या विषयीचे वातावरण बदलत गेले. एखाद्या गावात प्रचाराला गेल्यावर कुठे देवळात कुठे एखाद्या गरीबाच्या घरात मुक्काम करण्याची,कोणाच्याही ताटात जेवण्याची आपुलकीची पद्धत लंके यांनी त्यावेळी अवलंबली.यामुळे लंके हे आपल्यातीलच आहेत अशी भावना निर्माण झाली. तरुणांचा मोठा चाहता वर्ग त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. निवडणूक जवळ येऊ लागली तसतसे ज्येष्ठ नागरिक,महिला वर्ग,शेतकरी या सर्व घटकांना आपलंसं करण्यात लंके यांना बऱ्यांशी यश मिळाले. याचा परिणाम लंके हे बलाढ्य विरोधकास पराभूत करण्यात यशस्वी ठरले.
मतदारसंघ होऊ लागलाय ‘माऊली ‘ मय?
शिरूर विधानसभा मतदारसंघात माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर होण्याआधी महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर कोणी टिकणार नाही. अशाच स्वरूपाची चर्चा होती.कटके यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून कटके यांनी लंके पॅटर्न या मतदारसंघात राबवण्यास सुरुवात केली आहे. याचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून हवा बदलू लागल्याचे जाणकार सांगू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कटके हे शिरूर तालुक्यातील गावांना वाडी वस्त्यांवर जाऊन नागरिकांच्या भेटी घेत आहेत.त्यांचे साधे राहणीमान, बोलण्यातील नम्रता लोकांना भावत असल्याचे चित्र आहे.गाव भेटी दरम्यान गेल्या काही वर्षात कटके यांनी धार्मिक आनंद दिलेली मंडळी कुठे ना कुठे भेटत आहे.या मंडळींचे चरण स्पर्श करून माऊली आशीर्वाद घेताना दिसत आहेत.तालुक्यात विद्यार्थ्यांना वह्या वाटप,अनेकांना वैद्यकीय मदत अशा स्वरूपाची कटके यांच्या सामाजिक फाउंडेशनने केलेली कामे स्मरणात असणारी मंडळीही त्यांना कुठे कुठे भेटत आहेत.सामाजिक कार्यांची पेरणी कधी न कधी कामाला येऊ शकते.याचा अनुभव कटके यांना येत आहे.एकूणच माऊलींच्या विषयी लोकांच्या मनात निर्माण होत चाललेल्या या भावना परिवर्तनाची नांदी तर नाही ना! हे निकालानंतर कळेलच. मात्र मतदारसंघात निर्माण होत चाललेले ‘माऊली ‘मय वातावरण महायुतीचे आत्मविश्वास वाढवणारे ठरत आहे.