शिरूर ग्रामीण रुग्णालयात सोमवारपासून सुरू होणार कोविड सेंटर

तीस बेडची सुविधा, गरीब रुग्णांना मिळणार फायदा

0
शिरूरनामा न्यूजनेटवर्क

शिरूर:शिरूर ग्रामीण रुग्णालयात सोमवारपासून समर्पित कोविड आरोग्य सेंटर सुरू होणार असल्याने अखेर गरीब कोविड रूग्णांना दिलासा मिळणार आहे.या सेंटरमध्ये तीस बेडची व्यवस्था केली जाणार असून त्या दृष्टिने तयारी सूरू करण्यात आली आहे.

        काल ( ३ ) रांजणगांव एमआयडीसीमध्ये आयोजीत बैठकीत मंत्री दिलीप वळसेपाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात समर्पित कोविड आरोग्य सेंटर सुरु करण्याच्या सुचना दिल्या होत्या.वानुसार सोमवारपासून हे सेंटर रुग्णांच्धा सेवेसाठी सुरू होत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ( आयएमए ) शिरूर शाखेच्या डॉक्टरांनी पहिल्यापासून ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करण्याचा आग्रह धरला होता.मात्र शासनाने शहरातील तीन खासगी रुग्णालये अधिग्रहित करून तेथे कोविड सेंटर्स सुरु केली होती.यापैकी तीन रुग्णालयात कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत. या रूग्णांच्या उपचाराचे बिल जिल्हा परिषद देणार.असे सुरुवातीला या रुग्णालयांना सांगण्यात आले होते.मात्र आठवडाभरातच जिल्हा परिषदेकरून बिल मिळणार नाही. रुग्णांकडून बिल घ्यावे, अशा सुचना रुग्णालयांना देण्यात आल्या. रुग्णालये बिल घेऊ लागल्याने गरीब रुग्णांची हेळसांड होऊ लागली. याबाबत शिरूरनामाने वृत्त प्रसिद्ध केले होते.
        दरम्यान गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत म्हणून रुग्णालयांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी अर्ज करावा.या सुचना देण्यासाठी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी या रुग्णालयाच्या डॉक्टरांची बैठक घेतली.या बैठकीत डॉक्टरांनी या योजनेच्या मानधनात काम करणे शक्य नसल्याची कैफियत बैठकीत मांडली.तसेच ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करा, आम्ही शहरातील दोनशे डॉक्टर्स तेथे सेवा देऊ अशी भुमिकाही पुन्हा मांडली.याबाबत वरिष्ठांशी बोलतो असे आश्वासन प्रांताधिका- यांनी दिले होते.यानंतर काल वळ्सेपाटील यांनी घेतलेल्या बैठकीतही शिरूर ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करण्याबाबत चर्चा झाली.यावर वळसे पाटील यांनी आठवड्याच्या आत शिरूर ग्रामीण रुग्णालयात सेंटर सुरु करण्याच्या सुचना अधिका-यांना केल्या. यानुसार काम सुरू करण्यात आले असून सोमवारपासून हे सेंटर सुरु केले जाणार असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.तुषार पाटील यांनी सांगितले.ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू झाल्यानंतर नॉनकोविड रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आरटीसीमध्ये ओपीडीची व्यवस्था केली जाणार आहे.महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित असलेल्या माऊली हॉस्पिटलमध्ये प्रसुती सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.