शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:शहर व परिसरात मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले.आज सकाळपासूनच गणेश स्टॉल्सवर गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी घेऊन जाण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली.कोरोनाचे सावट कमी होत असल्याने गणेश भक्तांचा उत्साह आज ओसंडून वाहताना पहावयास मिळाला.
आजची सकाळ बँड पथक तसेच ढोल ताशाचा दणदणाट व गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावरील तसेच शहरातील विविध भागातील स्टॉल्स कडे गणरायाची मूर्ती आणण्यासाठी गणेश भक्तांनी वाट धरली.कोणी हातात, कोणी हातगाडीवर,कोणी सायकलवर,कोणी मोटरसायकलवर तर कोणी चारचाकी वाहनातून गणरायाला प्रतिष्ठापनेसाठी घेऊन जातानाचे चित्र होते. बँड पथक ढोल ताशा तसेच गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरयाचा गजर यामुळे अवघे वातावरण गणरायमय झाल्याचे दिसून आले. या सर्व वातावरणात बालचमुंचा उत्साह काही औरच होता.दुपारी चार वाजेपर्यंत घरगुती तसेच छोटी गणेश मंडळे यांनी वाजत गाजत गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेली.त्यानंतर शहरातील मोठ्या गणेश मंडळांनी गणरायाची मिरवणूक काढून मांडवामध्ये प्रतिष्ठापना केली.कोरोनामुळे मागील दोन वर्ष गणेशोत्सव साजरा करण्यास काही निर्बंध होते कोरोनाचे सांवट कमी झाल्याने शासनाने निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे गणेश भक्तांचा उत्साह ओसांडून वाहताना पहावयास मिळाला.यंदा भक्तांना विविध प्रकारचे देखावे पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. अनेक मंडळांनी यासाठी जोरदार तयारी केल्याचे चित्र आहे.