शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:सोशल मीडियाचे जग जितके मजेदार आहे तितकेच धोकेदायकही आहे.याचा अनुभव युजर्सना वेळोवेळी येत असतो.असाच एक अनुभव सध्या युजर्सना येत असून यात एक सुंदर महिला ऑनलाइन मैत्री करून मैत्री झालेल्या व्यक्तीस न्यूड होण्यास सांगत आहे.यास बळी पडलेल्या व्यक्तींना नंतर ब्लॅकमेल केले जात असल्याचे अनेक प्रकार पुढे येऊ लागले आहेत.
सुंदर चेहऱ्याचा डीपी असलेली महिला सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींना सुरुवातीला मैत्रीची साद घालते.अनेकजण त्वरित प्रतिसाद देतात. यानंतर चॅटिंग द्वारे ओळख वाढवली जाते.काही दिवसानंतर ही महिला या व्यक्तींना बाथरूम मध्ये जाऊन न्यूड व्हा व व्हिडिओ कॉल करा असा मेसेज करते.मी देखील होते.असे प्रलोभन दिले जाते.अशा प्रलोभनांना अनेक व्यक्ती बळी पडत असल्याचे चित्र आहे.जे या प्रलोभनांना बळी पडतात.त्यांना दुसऱ्या मिनिटाला फेक कॉल येण्यास सुरुवात होते.आपला न्यूड व्हिडिओ आमच्याकडे आहे. सोशल मीडियावर अपलोड करणार आहोत.व्हिडिओ अपलोड करायचा नसेल तर अमुक एवढी रक्कम ताबडतोब अमुक अकाउंट नंबरवर ट्रान्सफर करण्यास सांगितले जाते.बदनामीच्या भीतीने अनेक मंडळी ब्लॅकमेलिंगला बळी पडत आहे. शिरूर परिसरात घडलेल्या अशा प्रकारच्या एका प्रकरणात संबंधित व्यक्तीस असाच एक कॉल आला. त्या व्यक्तीने बदनामीच्या भीतीने रक्कम ट्रान्सफर केली. यानंतर त्या व्यक्तीला दिल्ली क्राइम ब्रांच अधिकारी बोलतोय असा कॉल आला. आपण एका महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवलात. तिच्या तक्रारीवरून आपल्यावर गुन्हा दाखल झाला असून आपणास अटक केली जाणार आहे. असे सांगण्यात आले.यानंतर काही वेळातच युट्युब चॅनेल चा पत्रकार बोलतोय म्हणून एक कॉल आला.कारवाई नको असेल तर अमुक रक्कम ट्रान्सफर करण्यास त्यांनी सांगितले. त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे रक्कम ट्रान्सफर केली. त्यानंतरही वारंवार त्याला कॉल करून ज्यादा रकमेची मागणी केली.त्या व्यक्तीला कारवाईची प्रचंड भीती दाखवण्यात आली.यामुळे ती व्यक्ती ज्यादा रक्कम देण्यास तयार झाली.रक्कम स्वतःकडे नसल्यामुळे त्याने उसने पासने घेऊन रक्कम जमा केली. (तीन दिवस या व्यक्तीस कॉल येत होते)रक्कम जमा करण्यासाठी एका केंद्रावर तो गेला असता तिथे त्याला त्याचा नातेवाईक भेटला.त्याने कसे बसे त्यास सर्व कहानी सांगितली. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्याच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आल्याने त्या नातेवाईकाने ‘शिरूरनामाशी’संपर्क साधला.
अतिशय भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या त्या व्यक्तीने सर्व प्रकार सांगितल्यावर त्याला आलेल्या कॉलची तपासणी केली असता, विक्रम राठोड या नावाने दिल्ली क्राईम ब्रँच अधिकारी म्हणून त्याला कॉल आले होते. राठोडच्या नंबरचा आयपीएस अधिकाऱ्याच्या वर्दीतील डी पी होता.दुसरा कॉल करणारा हा युट्युब चॅनेलचा पत्रकार सांगत होता.जादा रकमेसाठी तो वारंवार त्या व्यक्तीस कॉल करत होता.त्याचा कॉल शिरूरनामाने स्वीकारला. तुम्ही कोण बोलताय असे त्याने विचारले.मी देखील पत्रकार बोलतोय तुम्ही या व्यक्तीची फसवणूक केली असून तुमची पोलिसात तक्रार करणार आहोत असे सांगताच त्यांने फोन कट केला.त्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला कॉल आला नाही.पोलिसात तक्रार करूयात असे त्या व्यक्तीस सांगितले असता, बदनामीच्या भीतीने त्याने त्यास नकार दिला.
शिरूर मधील अनेकांना बी न्यूड चे कॉल आले आहेत सर्वच जण यास बळी पडतात असे नाही.मात्र नागरिकांनी अशा कॉल्सला प्रतिसाद न देता सजग राहणे गरजेचे आहे.