सौरउर्जा प्रकल्पामुळे रामलिंग ट्रस्टची दोन वर्षात चार लाख रुपयांची बचत

वीजेचा खर्च वीस हजारावरुन तीनशे रुपयांवर आला

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या रामलिंग मंदिर व परिसरातील दिवाबत्ती व वीजेच्या इतर वापरासाठी लागणारा दरमहा अठरा ते वीस हजार रुपयांचा खर्च रामलिंग ट्रस्टने कार्यान्वित केलेल्या सौर उर्जा प्रकल्पामुळे तीनशे रुपयांवर आला असून यामुळे गेल्या दोन वर्षात ट्रस्टची चार लाख रुपयांची बचत झाल्याचे ट्रस्टचे खजिनदार पोपटराव दसगुडे यांनी सांगितले.

शिरूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले शिरूर ग्रामीण येथील रामलिंग देवस्थान शहर व पंचक्रोशीतील हजारों भक्तांचे श्रध्दास्थान आहे.यामुळे रामलिंग ट्रस्टच्या माध्यमातून  मंदिर व परिसरात सतत विकासाची कामे सुरु असतात.यासाठी लागणाऱ्या खर्चाबरोबरच वीजेचा खर्चही मोठा होता.मुख्य मंदिर, सांस्कृतिक हॉल, बगिचा, भोजनालय, मंदिर भोवतालचा परिसर या भागात वीज व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच वीजेचा इतर कामासाठीही वापर केला जातो. दोन वर्षापूर्वी या वीज वापरापोटी ट्रस्टला अठरा ते वीस हजार रुपये वीजेच्या बिलाचा खर्च होता.मात्र सौरउर्जा प्रकल्पामुळे रामलिंग ट्रस्टला वीजेच्या वापरासाठी दरमहा केवळ तीनशे तेेे चारशे रुपये खर्च येत आहे.दोन वर्षापूर्वी रामलिंग ट्रस्टने १० किलोवॅटचा सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित केला.या प्रकल्पातून दररोज पन्नास युनिट वीजनिर्मिती होते.मंदिर व परिसरासाठी दररोज तीस ते बत्तीस युनिट वीजेचा वापर होतो.उर्वरीत वीज महावितरण घेते.यासाठी महावितरणकडून प्रकल्पधारकाला मोबदला दिला जातो.या मोबदल्यामुळे ट्रस्टचा वीज वापराचा खर्च तीनशे रुपयांपेक्षा कमी होऊन ट्रस्टची आणखी बचत होणार असल्याचे ट्रस्टचे खजिनदार दसगुडे यांनी सांगीतले.ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारीवाल,सहचिटणीस तुळशीराम परदेशी, खजिनदार पोपटराव दसगुडे,विश्वस्त गोधाजी घावटे,रावसाहेब पाटील,बलदेवसिंग परदेशी, वाल्मिकराव कुरंदळे,नामदेवराव घावटे,जगन्नाथ पाचर्णे,बबनराव कर्डिले,कारभारी झंजाड यांनी या प्रकल्पासाठी सकारात्मक भुमिका घेतली.सौरउर्जाप्रकल्पामुळे ट्रस्टचा फायदा झाला असून रामलिंगचा हा प्रकल्प जिल्ह्यात एक नंबरचा प्रकल्प असल्याचा दावा दसगुडे यांनी केला आहे.देवस्थानच्या प्रत्येक कामात ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारीवाल यांचे मोलाचे मार्गदर्शन व महत्वाचे योगदान लाभत असल्याचे दसगुडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.