शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदी माऊली कटके यांची भरघोस मताने निवड झाल्यानंतर प्रत्यक्षात माऊली कसे काय काम करतील अशी चर्चा होती.मात्र गेल्या ४१ दिवसांचा आढावा घेतला असता माऊलींची घोडदौड योग्य दिशेने जातानाचे चित्र आहे.त्यांच्याकडे विकासाची व्हिजन किती आहे हे आगामी काळात समजेलच मात्र पदाचा कसलाही गर्व न बाळगता ते सर्वसामन्यात रमत असल्याचे दिसून येत आहे.
कुठल्याच खिजगणतीत नसलेले माऊली कटके शिरूर हवेली मतदार संघाची निवडणूक जिंकून जायंट किलर ठरले.अगदी विरोधी उमेदवार अशोक पवार हे निवडणूक प्रक्रियेवेळी माऊली माझा स्पर्धक होऊच शकत नाही अशी वल्गना करीत होते.अशातही विक्रमी मतांनी निवडणूक जिंकून माऊली यांनी इतिहास रचला.त्यांच्यावर अनेक आरोप झाले.एका हौसिंग सोसायटी प्रकरणी त्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला.अनुभव कमी आहे.कसे काम करेल अशा ना ना शंका उपस्थित केल्या गेल्या.मात्र निवडून आल्यानंतर आमदार कटके यांनी आपल्या कार्य पद्धतीची जी काही चुणूक दाखवली आहे ती वाखण्याजोगी आहे.आमदारकीच्या पहिल्याच अधिवेशनात तालुक्यातील महत्वाच्या अशा बिबट्याचा उपद्रव तसेच शिरूर पुणे रस्त्यावरील वाहतूक प्रश्नावर त्यांनी आवाज उठविला.वाघोली जनता दरबार आयोजित करून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.(त्या किती सुटतील हे भविष्यात समजेलच.)सध्या त्यांचा मतदारसंघात आभार दौरा सुरू आहे.आज त्यांनी आभारदौरा आटोपल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.मात्र यावेळी मोठ्या प्रमाणावर जनता जमा झाल्याने त्याला जनता दरबाराचे स्वरूप प्राप्त झाले.याबाबत कसलीही हरकत न घेता आमदारांनी शांतपणे सर्वांच्या तक्रारी जाणून घेऊन प्रशासनाला तंबीही दिली.नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारावे लागू नये,प्रशासनाकडून नागरिकांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे.एकूणच गतिमान प्रशासनाची अपेक्षा आमदार कटके यांनी केली.प्रशासना बाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत.यामुळे प्रशासन गतिमान करण्यासाठी आमदार यांना जातीने लक्ष घालावे लागेल.
दरम्यान बैठकीपूर्वी आमदार कटके यांनी शहरात येताच प्रथम बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. प्रख्यात साहित्यिक अण्णाभाऊ साठे नामकरण फलक तसेच भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास देखील पुष्पहार अर्पण केला.त्यांनतर त्यांनी शहरातून पदयात्रेद्वारे जनतेचे आभार मानले.यावेळी नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.यात कोणी हमाल होता,कोणी व्यापारी होता,कोणी रिक्षा वाला,कोणी हातगाडीवाला तर कोणी चहा वाला होता.सर्वांची अगदी प्रेमाने संवाद साधत त्यांच्या सोबत फोटो काढत त्यांनी आपला आभारदौरा पूर्ण केला.यात ते ज्या पद्धतीने वावरले ते पाहता,ते सर्वसामान्यात सहजपणे वावरतात हेच प्रकर्षाने दिसून आले.कुठेही पदाचा बडेजाव,अहंकार दिसून आला नाही.प्रत्येकात आपलेपणाची भावना निर्माण करण्यात जणू काही ते अल्पावधीतच यशस्वी ठरले.असे म्हटल्यास वावगे ठरणर नाही.अनेकदा लोकांना विकासकामापेक्षा नेत्याने आपल्या खांद्यावर हात ठेवल्याचे अप्रूप असते.यात सध्यातरी माऊली सरस दिसत आहेत.राहिला मुद्दा विकासकामांचा तर आमदार कटके यांच्या समोर हे आव्हान असणार आहे.मतदारसंघातील प्रश्न त्यांना माहीत आहे.मात्र त्याची सोडवणूक करण्यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक समस्या दिवसेंदिवस उग्र होऊ लागली आहे.ही समस्या आमदार महोदय कशा पद्धतीने सोडवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.दुसरी महत्वाची समस्या म्हणजे प्रशासकीय सर्वच विभागांकडून नागरिकांची होत असलेली अडवणूक.ही समस्या सोडल्यास जनता आमदार कटके यांना डोक्यावर घेईल.आमदार कटके यांनी प्रशासनाला तंबी दिली खरी मात्र ही समस्या किती जटिल आहे याचा त्यांना अनुभव येतीलच.अर्थातच समस्या भरपूर आहेत.मात्र प्राधान्यक्रमाने त्या सोडवल्या जाव्यात एवढी माफक अपेक्षा जनतेला असणार आहे.