संविधान प्रत्येकाच्या जगण्याचा भाग बनावा – राजवैभव

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: ७५ वर्षात संविधानाचा गाभा व मूल्य याचा आशय अजून लोकांपर्यंत पोहोचलेला नाही.संविधान हा सर्वसामान्यांच्या जगण्याचा भाग बनला तसेच ते केवळ ऐकले नाही तर बोलले गेले तरच ते लोकांपर्यंत पोहोचेल.असे मत महाराष्ट्र संविधान समितीचे सचिव राजवैभव शोभा रामचंद्र यांनी येथे व्यक्त केले.

         शिवजयंतीनिमित्त येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित स्व धनराज नहार स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प राजवैभव यांनी गुंफले.यावेळी त्यांनी संविधान उद्देशिकेमधल्या सार्वभौम,समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य,न्याय,स्वातंत्र्य व बंधुता या प्रत्येक शब्दाचा अर्थ व त्याचे महत्त्व उलगडून सांगितले.श्रेणिक नहार अध्यक्षस्थानी होते. जिल्हा दक्षता समितीचे सदस्य शोभना पाचंगे, सामाजिक कार्यकर्ते संदीप बर्वे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.राजवैभव म्हणाले,या देशाला सार्वभौम,समाजवादी, धर्मनिरपेक्ष घडवण्याचे संविधान सांगते.गणराज्य, न्याय,स्वातंत्र्य,समानता व बंधुता संविधानाला अभिप्रेत आहे.मात्र गेली ७५ वर्ष आपण हे फक्त बोलत राहिलो.अजूनही संविधानाचा गाभा व मूल्य याचा आशय अजून लोकांपर्यंत पोहोचलेला नाही.हा देश ज्या पुस्तकावर चालतो ते संविधान नावाचं पुस्तक वाचणे तर सोडा किती लोकांनी हातात घेतले हा प्रश्न आहे.संविधानाने तुमच्या माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला त्याची प्रचंड अशी ताकद असून संविधान प्रत्येकाने समजून घ्यायला हवे.खरतर संविधान हा सर्वसामान्यांच्या जगण्याचा भाग बनला पाहिजे.त्याची सांगण्याची बोलण्याची भाषा ही लोकांची असली पाहिजे.संविधान केवळ ऐकलं नाही तर बोलले गेले पाहिजे.अशी अपेक्षा राजवैभव यांनी केली.जेव्हा सर्वसामान्य माणूस संविधानाची भाषा घेऊन आपल्या हक्कांच्या व अधिकारांच्या बाबतीत प्रश्न विचारायला लागेल तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्यपूर्ती होईल.असे ते म्हणाले.

            जयंती उत्सव समितीचे प्रमुख रवींद्र धनक यांनी स्वागत केले.समन्वयक ॲड.ओमप्रकाश सतीजा यांनी आपल्या प्रास्ताविकात समितीच्या कार्याचा आढावा घेतला.व्याख्यानमालेचे यंदाचे २८ वे वर्षे असून व्याख्यानमाला यशस्वी करणाऱ्या श्रोत्यांचे यावेळी त्यांनी ऋण व्यक्त केले.सतीश गवारी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. संजय बारवकर व शहाजी पवार यांनी सूत्रसंचालन केले तर ॲड.प्रदीप बारवकर यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.