प्रवीण गायकवाड
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस.विविध दैनिकात त्यांच्या शुभेच्छांच्या जाहिराती पाहिल्यावर सांगा पाहू आम्ही कोणाचे?साहेबांचे की दादांचे?..असाच प्रश्न विचारला गेला की काय असा प्रश्न पडावा.
अजित दादांनी बंड करून भाजपा शिवसेनेच्या सरकारमध्ये ते सहभागी झाले.उपमुख्यमंत्री झाले.त्यांच्या समर्थक आमदरांपैकी आठ जणांना मंत्रिपद मिळाले.यानंतर दादांनी पक्षावर व पक्ष चिन्हावर आपला दावा सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धावही घेतली.आपल्या भाषणातून पवार साहेबांवर टीकाही केली.यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आमच्या विषयी काही बोला आई बापावर नाही बोलायचं.असा इशाराही दिला.पवार गटाचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही दादांवर टीका केली.दोन्हीही गटांनी कोणाकडे किती आमदार,खासदार तसेच किती पदाधिकारी याची गोळा बेरिजही जाहीर केली.हे सर्व घडत असतानाच अधिवेशनाच्या सुरुवातीला दादा सर्व मंत्री,आमदारांना घेऊन साहेबांना भेटायला गेले.साहेबांनी या सर्वांनी दिलेला प्रस्ताव स्वीकारला नाही.यानंतर साहेब INDIA च्या तर दादा NDA च्या बैठकीला गेले.याचा अर्थ दोघेही आपापल्या विचारावर ठाम राहिल्याचे दिसून आले.
या सर्व घडामोडीनंतरचा दादांचा आजचा वाढदिवस.वाढदिवसानिमित्त अनेक दैनिकात,इतरही माध्यमात आज जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत.दादांच्या गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची जाहिरात चर्चा करावी अशीच आहे.त्यांनी दिलेल्या जाहिरातीत जिल्ह्यातील सर्व आमदार, (जे पवार साहेबांच्या गटात आहे ते देखील) जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष यांचे फोटो आहेत.यात पवारसाहेब,सुप्रियाताई या दोघांचेही फोटो आहेत.शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार हे साहेबांसोबत आहेत.मात्र त्यांचे मेहुणे व्यंकटेश कृपा शुगर मिल्सचे अध्यक्ष संदीप तौर यांनीही दादांची जाहिरात दिली आहे.पवार साहेब, सुप्रियाताई यांचा फोटो तर आहेच.मात्र यात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील,दादांच्या गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचाही फोटो आहे.
दिलीप वळसे पाटील यांच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या जाहिरातीतही पवार साहेबांचा फोटो आहे.या जाहिराती पाहिल्यावर नेते मंडळी तसेच पदाधिकाऱ्यांनी सांगा पाहू आम्ही कोणाचे, साहेबांचे की दादांचे?असाच प्रश्न कार्यकर्त्यांना तसेच नागरिकांनाही केला की काय असा प्रश्न पडावा.या जाहिराती अजून एक गोष्ट अधोरेखित करतात.ते म्हणजे राष्ट्रवादीचा बॉस मोठे पवारच आहेत.बंडाचे फलित अथवा त्याचे भविष्य यथावकाश समजेलच.तूर्त तरी पक्षातील सर्वांच्याच (दादांच्या गटातीलही) मनात अद्यापही साहेबांची प्रतिमा आहे.
बंड शिवसेनेतही झाले.मात्र ना इकडचे तिकडे गेले. न तिकडचे इकडे आले.बंडखोरांनी बंडखोरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी केली.यानंतर पुन्हा त्यांच्याशी संबंध ठेवलेच नाही.त्यांनी पक्षाचा ताबाही मिळवला.ठाकरेही त्यांना वेळोवेळी गद्दार संबोधून आपला राग व्यक्त करीत आहेत.यातून लोकांना शिवसेनेच्या बंडाची सत्यता समजली आहे.राष्ट्रवादीच्या बंडाची सत्यता समजण्यास कळायला कदाचित वेळ लागेल.