शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित आंतरशालेय समूहगायन स्पर्धेत बालाजी विश्व विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांकाचा करंडक पटकावला.आमदार ॲड.अशोक पवार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
शिरुर नगरपरिषद,महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरुर,पसायदान संस्था,शिरुर व जायंट्स क्लब शिरुर यांच्या सयुंक्त विद्यमानाने येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश स्कूल, बाबूराव नगर येथे समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.नगर परिषदेचे मुख्याधिकारी ॲड.प्रसाद बोरकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.पसायदान संस्थेचे अध्यक्ष व्ही. डी. कुलकर्णी,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष नीलेश खाबिया,कार्याध्यक्षा प्रा क्रांती पैठणकर,जायंटस क्लब, शिरुरचे अध्यक्ष प्रा .विलास आंबेकर,डेक्कन स्कूल शिरुरचे प्राचार्य डॉ.प्रा.समीर ओंकार,रामलिंगचे माजी सरपंच विठ्ठल घावटे,शिरुर नगरपरिषदचे अधिकारी भूषण कडेकर,अजीम सय्यद,श्रीहरी मेंदरकर आदी यावेळी उपस्थित होते.शहर व परिसरातील एकूण १९ शाळांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले. प्रत्येक संघाला देशभक्तीपर दोन गीते सादर करण्याची संधी देण्यात आली.एकूण सर्वच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण गीतांमुळे देशभक्तीमय वातावरण तयार झाले.सर्व संघांचे गीत सादरीकरण झाल्यानंतर आमदार अशोक पवार यांच्या हस्ते विजेत्यांना करंडक प्रदान करण्यात आला.आमदार पवार यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करताना अशा स्पर्धांमुळे देशाचे भविष्य असणाऱ्या या विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच राष्ट्रप्रेमाची भावना जागृती होईल.तसेच स्वातंत्र्यसंग्रामात बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांचे ते कायम स्मरण करत राहतील असा विश्वास व्यक्त केला.तहसीलदार प्रशांत पिसाळ व मुख्याधिकारी ॲड,प्रसाद बोरकर यांनी ‘हर घर तिरंगा उपक्रम’ तसेच स्वातंत्र्यवीरांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
विद्याधाम प्रशाला व न्यू इंग्लिश स्कूल यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक तसेच संस्कारक्षम पुस्तके भेट देण्यात आली.प्रा.केशव गाडेकर व महेंद्र पळसकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.प्रा.सतीश धुमाळ यांनी प्रास्ताविक,गणेश मराठे यांनी सूत्रसंचालन केले.तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य डॉ.समीर ओंकार यांनी आभार मानले.