शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर:शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या विरोधात कोण याबाबत सध्या विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहे.मात्र शिरूर लोकसभा मतदार संघात असलेल्या सहाही विधासभा मतदार संघाचा समतोल विकास साधणारा खासदार असावा अशी मतदारांची अपेक्षा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या विरोधात कोणाची उमेदवारी असणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.या मतदार संघात सलग तीनदा निवडून आलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांची विजयाची घोडदौड कोल्हे यांनी रोखली.मागील निवडणुकीत आढळराव यांचा पराभव झाला.मात्र त्यांनी न खचता मतदार संघात आपला संपर्क कायम ठेवला.शिवसेना फुटल्यावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंद केले.केवळ पसंदच केले नाही तर,त्यांच्या माध्यमातून शिरूर मतदार संघात निधी आणण्याचा सपाटा लावला.एकूणच ही धडपड पुन्हा एकदा शिरूर लोकसभेचे मैदान मारण्याचा त्यांनी चंग बांधला आहे.हेच दर्शवते.अशात पुन्हा कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील असाच सामना रंगण्याची चर्चा सुरू असताना आढळराव पाटील यांची म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झाली.ही निवड म्हणजे त्यांचा आता शिरूर लोकसभा उमेदवारीचा पत्ता कट.अशीच चर्चा रंगू लागली.दरम्यान मी शिरूर लोकसभा लढणार आणि जिंकणार अशी डरकाळी आढळराव पाटील यांनी फोडली.यामुळे ते शिरूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात कसे उतरणार याची उत्सुकता लागली आहे.
आढळराव पाटील हे शिंदे गटात आहेत.महायुतीच्या जागा वाटपात शिरूर लोकसभेची जागा अजित दादा गटाकडे जाणार हे निश्चित आहे.अशात आढळराव पाटील यांना उमेदवारी साठी दादा गटाची वाट धरावी लागू शकते.गेल्या पाच वर्षांतील परिस्थिती पाहता,कोल्हे हे मतदार संघात अपेक्षित प्रभाव पाडू शकले नाही.(भलेही त्यांना संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले असेल.)याउलट आढळराव पाटील यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून मतदार संघात निधी आणला असल्याचे वास्तव आहे.मात्र ते देखील त्यांच्या कार्यकाळात समतोल विकास साधण्यात पूर्ण यशस्वी झाले.असे म्हणता येणार नाही.ते खासदार असताना शिरूर शहर वायफाय युक्त करू,शहरात संपर्क कार्यालय खोलून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊ या केवळ वल्गनाच ठरल्या.(उदाहरणादाखल) कोरोना काळात त्यांनी शिरूरला भेट दिली तेव्हा शिरूरमध्ये उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते.कोल्हे यांनीही असेच आश्वासन दिले होते.मात्र दोघांनीही याकडे गांभीर्याने पाहिले नाही.आपापल्या भागाकडे जास्त कल या नेत्यांचा दिसून आला आहे.कोल्हे यांचे असेच विशिष्ट प्रेम त्यांच्या निधी वाटपाच्या आकडेवारीतून दिसून येईल.शिरूर मतदार संघात शिरूर- हवेली,खेड,जुन्नर,आंबेगाव,भोसरी व हडपसर अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.निवडून येणाऱ्या खासदारांनी काम करताना या सर्व मतदारसंघाचा समतोल विकास करणे अपेक्षित आहे.दुर्दैवाने गेल्या चार पंचवार्षिक मध्ये असे दिसून आले नाही.असेलतर लोकप्रतिनिधींनी जाहीर करावे.उद्या कोल्हे यांच्या विरुद्ध कोण उमेदवार असेल हे अद्याप अस्पश्ट आहे.कदाचित पार्थ अजित पवार असतील,महेश लांडगे असतील अथवा विलास लांडे असतील.(धक्कातंत्रतर्गत अजून कोणी असेल)जो कोणी निवडून येईल त्याने बस मतदारसंघाचा समतोल विकास साधावा एवढीच मतदारांची अपेक्षा आहे
.