सहाय्यक पोलीस निरीक्षकाची खाकी वर्दीतील कणव

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:खाकीवर्दीतील कडकपणा जसा आपण पाहतो तसेच अनेकदा खाकीवर्दीमधील माणुसकीचे दर्शन आपल्याला होत असते. शिरूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक उंद्रे यांनी आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटर मधील रुग्णांसाठी १०० वाफेचे मशीन तसेच पाण्याचे बॉक्सची मदत करून खाकी वर्दीतील कणव दाखवून दिली.

          कोरोना महामारीच्या कठीण प्रसंगात दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांच्या कार्याचे सर्वांनाच कौतुक आहे.केवळ कर्तव्यच नव्हे तर अनेकदा त्यांच्यातील सामाजिक बांधिलकी समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच शिरूर पोलीस ठाण्यात पदभार  स्वीकारलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक उंद्रे यांनी अल्पावधीतच आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली. खाकी वर्दीचे कर्तव्य तर आपण बजावत आहोतच.मात्र सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आपणही सध्याच्या कोरोनाच्या कठीण प्रसंगात यथाशक्ति मदत करावी अशी सकारात्मक भावना उंद्रे यांच्या मनात जागृत झाली.पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके हे उंद्रे यांचे मित्र असून आपले मित्र कोरोनाच्या कठीण प्रसंगात करीत असलेल्या अमूल्य कार्यात आपलाही खारीचा वाट्याप्रमाणे सहभाग असावा म्हणून उंद्रे यांनी आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी १०० वाफेचे मशीन तसेच पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स मदत म्हणून दिले. आमदार लंके यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आले.उंद्रे हे वास्तव्यास असलेल्या येथील ‘श्री हाईट्स’ या सोसायटीतील बांधवांचे यात सहकार्य लाभले असे उंद्रे यांनी सांगितले.बाळासाहेब सोनवणे,बाळासाहेब तातेड,महेश बाफना,भावेश शहा आदी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.