एसटी बसवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक

शिरूर पोलिसांची कारवाई

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:शिरूर चौफुला रस्त्यावर आंधळगाव फाट्याजवळ एसटी बसवर दगडफेक करणाऱ्या तिघांना शिरूर पोलिसांनी अटक केली.यातील दोघे शिरूर एसटी आगाराचे कर्मचारी आहेत.राज्य शासन व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रवासी सेवा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असून यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी दिला आहे.

        भरत तानाजी माने (वय ३५ रा.न्हावरे ता. शिरूर जि. पुणे),अमर तुकाराम ठुबे (वय ३० रा.अण्णापूर ता.शिरूर जि.पुणे )व योगेश अशोक सोनवणे (वय३४  रा.राळेगण थेरपाळ ता.पारनेर जि.अहमदनगर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,११ डिसेंबर रोजी सकाळी दौंड आगाराची एसटी बस शिरूर ते चौफुला प्रवाशांना घेऊन जात असताना आंधळगाव फाट्याजवळ मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी बसच्या पुढील काचेवर दगडफेक केली व तेथून पलायन केले.याबाबतची माहिती शिरूर पोलिसांना मिळाल्यावर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय अधिकारी राहुल धस,पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे,पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव,सहाय्यक उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप,पोलीस हवालदार गोपीनाथ चव्हाण,गणेश देशमाने व पोलीस नाईक अनिल आगलावे यांच्या पथकाने तातडीने तपास करून तिघांना अटक केली.या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.त्यांना  न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
         राज्य शासन,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तसेच पोलीस दल हे प्रवासी सेवा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असून यामध्ये महामंडळाच्या रुजू न झालेल्या कामगारांनी तसेच जनतेने अडथळे आणू नयेत असे आवाहन पोलीस निरीक्षक राऊत यांनी केले आहे.अडथळे आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा राऊत यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.