रायरेश्वर पठारावरील रोहित्र बदलण्याची अवघड मोहीम महावितरणने केली फत्ते

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क 

शिरूर:महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रायरेश्वर पठारावरील रोहित्र बदलण्याची अतिशय आव्हानात्मक मोहीम तीन दिवसात फत्ते केली.सहा किलोमीटर डोंगरदऱ्यातून ७०० कीलोचे रोहित्र पठारावर नेण्यासाठी कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.मात्र स्थानिकांच्या सहकार्याने ही मोहीम सुकर होऊ शकली.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली.त्या रायरेश्वर किल्ल्यावर २०१९ साली महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी ६३ केव्ही क्षमतेचे रोहित्र आणि खांब अंगाखांद्यावर नेऊन विद्युतीकरणाचे काम केले होते.रायरेश्वर किल्ला भोर तालुक्यात असून, महावितरणच्या निगुडघर वीज उपकेंद्रातून किल्ल्यावर व परिसरातील वस्त्यांना वीजपुरवठा केला जातो. हिर्डोशी शाखेचे कर्मचारी त्यासाठी सदैव तत्पर असतात. रायरेश्वरच्या किल्ल्यापासून पुढे वरची धानवली व वाघमारे वस्ती आहे.रोहित्रावर ३० वीज जोडण्या असून, त्यापैकी एक रोहित्र शनिवारी (दि. ३ फेब्रु.) नादुरुस्त झाले.हे रोहित्र जागेवरच दुरुस्त करण्यासाठी शाखा अभियंता सागर पवार यांनी खूप प्रयत्न केले.मात्र यश आले नाही.यामुळे नवीन रोहित्र बसवणे हाच पर्याय होता.या ठिकाणी नवीन रोहित्र बदलणे म्हणजे एक मोठे आव्हानच होते.एका ठेकेदाराने त्याचे ८-१० परप्रांतीय मजूर पाठवले.हिर्डोशी शाखेचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ त्यांना मदत करण्यास पुढे आले.मात्र समोरचा सह्याद्री पाहून या मजुरांनी माघार घेत पळ काढला.मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी हार मानली नाही. स्थानिकांनी त्यांना मोलाची मदत केली. साधारणत: ६ किलोमीटरचे डोंगरदऱ्यातील अंतर पार करायचे होते. त्यासाठी त्यांनी तीन टप्पे पाडले.

बुधवारी (दि.७) सकाळी मोहिमेला सुरुवात झाली. पहिला टप्पा शिडीचा होता.अरुंद व खडी पायवाट. त्यात किमान ७०० किलो वजनाचे रोहित्र. नवगणची (लाकडापासून बनवलेले जुगाड) मदत घेत मोठ्या हिंमतीने एक-एक पायरी चढायला सुरुवात केली आणि दिवसभरात पहिला टप्पा गाठला. दुसऱ्या दिवशी कड्यापासून पाच किलोमीटरचा टप्पा सायंकाळी पूर्ण झाला. अंधार झाल्यामुळे शुक्रवारी सकाळी तिसरा टप्पा सुरु केला. अंतर थोडेच उरले असले तरी जुने रोहित्र उतरुन दुसरे चढवायचे व तांत्रिक बाबी पूर्ण करुन ते चालू करणे ही कामे होती. ‘हर… हर… महादेव’ व छत्रपती शिवरायांचा जयघोष करत; सर्व आव्हानांना तोंड देत शुक्रवारी ( दि. ९) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नवीन रोहित्र सुरु करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.

महावितरणतचे शाखा अभियंता सागर पवार यांचेसह यंत्रचालक दिपक शिवतरे,जनमित्र राजू वणवे, रणजित बाबर व भगवान ठाकूर, निम्नस्तर लिपिक अक्षय शिवतरे, बाह्यस्रोत कर्मचारी गुणाजी तुपे, संतोष जेधे, श्रीकांत पारठे, अजय पारठे, निवृत्ती कंक, आखाडे एजन्सीचे विजय नवले व संजय पाटील यांचा या मोहिमेत सहभाग होता. तर धानवली व वाघमारे वस्तीवरील सुरेश वाघमारे, लक्ष्मण धानवले, श्रीराम धानवले, नथु धानवले, गणेश धानवले, रामभाऊ डोईफोडे, नामदेव वाघमारे, गणेश वाघमारे, अनिल धानवले, अजित धानवले, मुकुंद धानवले व संतोष धानवले या ग्रामस्थांनीही अथक परिश्रम घेतले. टीमवर्कमुळेच ही मोहीम फत्ते झाली.मुख्य अभियंता श्री. सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता श्री. चंद्रशेखर पाटील व कार्यकारी अभियंता श्री. अरविंद वनमोरे यांनी अधिकारी,कर्मचारी व ग्रामस्थांचे कौतुक केले.

 

दोन वर्षापूर्वी हेच रोहित्र पहिल्यांदा नादुरुस्त झाले होते. त्यावेळी ठेकेदाराला रोहित्र वर नेण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागला होता. त्या तुलनेत यावेळी हे काम फक्त तीन दिवसांत पूर्ण केल्याचा आनंद वीज कर्मचाऱ्यांना होता.

Leave A Reply

Your email address will not be published.