शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर:१९८२ साली उद्योगपती रतन टाटा यांनी येथील प्रकाश शांतीलाल बोरा यांच्या दुकान व घरी भेट दिली होती.१९५६ सालापासून बोरा कुटुंबीयाचे टाटा यांच्या बरोबर व्यावसायिक व कौटुंबिक संबंध होते.टाटा यांच्या निधनाबद्दल प्रकाश बोरा यांचे चिरंजीव आदेश बोरा यांनी शोक व्यक्त केला.
१९५६ सा ली शांतीलाल सुरज बोरा यांनी येथील बस स्थानकासमोर आदर्श सायकल्स नावाने व्यवसाय सुरू केला. यावेळी त्यांच्याकडे टाटा यांचे नेल्को टीव्ही नेल्को रेडीओ ॲम्बेसिडर,हंबर,रायले हे सायकल्स ब्रँड विक्रीसाठी होते.टाटांच्या सर्व उत्पादनांची बोरा यांनी मोठ्या प्रमाणावर विक्री करण्याचा धडाका त्यावेळी लावला होता. याची दखल घेऊन १९८२ साली रतन टाटा यांनी बोरा यांच्या आदर्श सायकल्स या दुकानास तसेच घरी भेट दिली होती.टाटा कंपनीचे मालक स्वतः आपल्या घरी आल्यामुळे बोरा कुटुंबीय भारावून गेले होते.उच्चांकी विक्री केली म्हणून टाटा यांनी त्यावेळी बोरा कुटुंबीयास ॲबेसेडर कार भेट दिली होती. टाटा यांनी त्यावेळी बोरा यांच्या घरी तीन तासाहून अधिक वेळ व्यतीत केला होता.यानंतर बोरा कुटुंबीयांचे टाटा यांच्यासोबत कौटुंबिक संबंध प्रस्थापित झाले होते. शांतीलालजी हे मुंबईला गेल्यानंतर आवर्जून टाटा यांची भेट घेत असत.टाटा देखील नेहमी बोरा कुटुंबियांची फोनवर आस्थेने चौकशी करत असत. शांतीलालजी यांच्या निधनानंतर प्रकाशजी देखील टाटा यांच्या संपर्कात होते.२०१८ साली प्रकाशजी यांनी मुंबईत टाटा यांच्या निवासस्थानी टाटांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी प्रकाशजी यांचे चांगले आदरातिथ्य केल्याचे आदेश बोरा यांनी सांगितले. आदेश यांनी येथील सरदार पेठ येथे आलिशान असे सायकलचे शोरूम सुरू केले असून याचे उद्घाटन टाटा यांच्या हस्ते करण्याची मनीषा त्यांना होती. मात्र टाटा यांच्या निधनामुळे हे मनीषा अपुरी राहिली.याची खंत आदेश यांनी बोलून दाखवली.