शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:शरद पवार हे आमचे दैवत आहेत.मात्र आमच्या राजकीय सामाजिक जीवनात अजित दादा पवार हाच चेहरा आम्हाला माहीत आहे.यामुळेच दादांबरोबर राहण्याचा निर्णय घेतल्याची भूमिका शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी बापू काळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे.मात्र त्यांचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला.कालच त्यांनी अजित दादांच्या गटाचे तालुकाध्यक्ष पदही स्वीकारले.याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यावेळी नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत संभ्रमावस्था होती.मात्र उपमुख्यमंत्री पवार यांची भूमिका ऐकल्यानंतर त्यांच्या समवेत जाण्याचा निर्णय घेतला.आजचे जिल्ह्यातील चित्र पाहता,जिल्ह्यातील बहुसंख्य आमदारांबरोबरच जिल्हा बँक असो, दूध संघ असो,राष्ट्रवादीच्या ताब्यातील असणाऱ्या अशा संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य या सर्वांचेच बहुसंख्येने दादांना समर्थन आहे.अजित दादांच्या बैठकीला या सर्वांबरोबर जिल्ह्यातील १३ पैकी १० तालुकाध्यक्ष उपस्थित होते.अर्थात अजितदादा हाच आमच्या राजकीय सामाजिक जीवनाचा चेहरा असल्याने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे काळे म्हणाले.
दादांबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तालुक्यातील अनेक सहकाऱ्यांचे मनोगते मी जाणून घेतली.यानंतर मी वैयक्तिकरित्या दादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.यापुढे ज्यांना अजितदादांची कामाची पद्धत,त्यांचे विचार पटतील.तसेच माझी भूमिकाही पटेल त्यांना बरोबर घेऊन पुढची वाटचाल करणार असल्याचे तसेच माझ्यासोबत तालुक्यातील कितीजण हे काही काळानंतरच कळेल असे काळे यांनी सांगितले.अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आमदार अशोक पवार यांच्याशी याबाबत सल्लामसलत केलीत का? या प्रश्नावर काळे म्हणाले, अजित दादा बरोबर राहिल्यास तालुक्याच्या हिताचे राहील.अशी भूमिका आमदार पवारांसमोर मांडली. याबरोबरच रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना सध्या अडचणीच्या काळातून जात असताना दादांबरोबर गेल्यास सरकारच्या माध्यमातून कारखान्याचे प्रश्न सुटण्यासाठी मदत मिळू शकेल.असेही सांगितले.
आमदार पवार यांनीच मला ही भूमिका घेण्यास सांगितले असावे.असा अनेकांच्या मनात प्रश्न आहे.मात्र त्यात तथ्य नसल्याचे काळे म्हणाले.पवार यांचा कट्टर समर्थक तसेच त्यांनीच तालुकाध्यक्ष केले असताना असा निर्णय का घेतला.असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे.१९९७ साली वय वर्ष २७ असताना माझ्या परिवाराने कारखाना पवारांच्या ताब्यात दिला.हा आमचा त्याग नाहीका? असा सवाल काळे यांनी केला.यानंतर तब्बल १८ वर्षांनी मला न्याय मिळाला.२००९ साली पंचायत पंचायत समिती सदस्य असताना त्या वेळेच्या विधानसभा निवडणुकीत आमदार पवार यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले.त्यांनी जेव्हा कधी हाक मारली तेव्हा तत्परतेने हजर राहिलो.गेली १४ वर्ष मी त्यांच्या सोबत आहे.मात्र निष्ठेला तडा जाऊ दिला नाही.त्यामुळे मी घेतलेली भूमिका आमदार पवार यांच्याशी प्रतारणा करणारी नाही.असे ठामपणे काळे यांनी सांगितले.
खरेदी-विक्री संघाचे माजी सभापती शरद कालेवार, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अविनाश मल्लाव, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कांतीलाल होळकर,शांतीलाल काळे,प्रल्हाद काळे,दत्ता जाधव,माजी ग्रा.प.सदस्य रवी काळे,बाळासाहेब काळे,सुनील साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.