शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर: पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी नवीन आवृत्तीचे टॅब उपलब्ध झाले असून टॅब अभावी प्रलंबित जिल्ह्यातील प्रकरणांचे उद्यापासून व्हेरिफिकेशन केले जाणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ‘शिरूरनामा’शी बोलताना दिली.
जुन्या आवृत्तीच्या टॅबमुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये गेले अनेक दिवसांपासून पासपोर्टची वेरिफिकेशन होत नव्हते. यामुळे नागरिकांना पासपोर्ट मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.नवीन आवृत्तीचे टॅब जोपर्यंत उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत व्हेरिफिकेशन होऊ शकणार नाही.असे पोलीस ठाण्यांकडून सांगण्यात येत होते.याबाबत पोलीस अधीक्षक देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, जिल्ह्यात ३५ टॅब उपलब्ध वितरित केले जाणार असून ५ टॅब हेवी पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. इतर ३० टॅब आज संध्याकाळी उपलब्ध होणार असून उद्यापासून प्रलंबित प्रकरणांची निर्गती करण्यास सुरुवात होईल.असे त्यांनी सांगितले. पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर प्रथम कागदपत्रांची छाननी होते. यानंतर पासपोर्ट कार्यालयाच्या वतीने संबंधित प्रकरण पोलीस वेरिफिकेशन साठी पोलीस ठाण्याकडे पाठविली जातात.ऑनलाइन वेरिफिकेशन करून पोलीस ठाण्यांकडून ही प्रकरणे विभागीय पासपोर्ट कार्यालयाकडे पाठवली जातात. यानंतर पासपोर्ट वितरित केले जातात. पासपोर्ट मिळण्याची प्रक्रिया शासनाने सुलभ केली असल्याने पासपोर्ट साठी पासपोर्ट कार्यालयामध्ये सातत्याने गर्दी असल्याचे जाणवते.जुन्या आवृत्तीची टॅब मुळे या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता.पोलीस अधीक्षक देशमुख यांनी यात जातीने लक्ष घातल्याने पोलीस ठाण्यांना नवीन आवृत्तीचे टॅब उपलब्ध होणार असून उद्यापासून ही प्रक्रिया सुलभ होणार आहे.