शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर: पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे आज पासपोर्ट व्हेरिफिकेशनची प्रलंबित प्रकरणे निर्गती करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.आज जिल्ह्यातील बहुतांशी पोलीस ठाण्यांना नवीन आवृत्तीचे टॅब वितरित करण्यात आले. यामुळे नागरिकांना पुढील काही दिवसांत दिलासा मिळणार आहे.
गेली काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये पासपोर्ट पोलीस व्हेरिफिकेशनचे काम ठप्प झाले होते. जिल्ह्यातील शेकडो प्रकरणे यामुळे प्रलंबित होती.नवीन आवृत्तीचे टॅब उपलब्ध झाल्यावर पासपोर्ट व्हेरिफिकेशनचे काम सुलभ होणार होते. यासंदर्भात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आजपासून (२३ मे) जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना नवीन आवृत्तीचे टॅब उपलब्ध होऊन प्रलंबित प्रकरणाची निर्गती होणार असल्याचे सूतोवाच ‘शिरूरनामा’शी बोलताना केले होते. पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे आज पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील बहुतांशी पोलीस ठाण्यांना पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी नवीन आवृत्तीचे टॅब उपलब्ध करण्यात आले. जिल्ह्यातील शेकडो प्रलंबित प्रकरणांमध्ये एकट्या शिरूर पोलीस ठाण्यामध्ये जवळपास १२० प्रकरणे प्रलंबित होती. शिरूर पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे राजेंद्र गोपाळे यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन नवीन आवृत्तीचा टॅब स्वीकारला.आज संध्याकाळी ५ वाजता गोपाळे पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले.तेथून टॅब घेऊन ते लगेच शिरुरकडे निघाले.येताना प्रवासातच त्यांनी टॅबवर प्रलंबित प्रकरणे निर्गती करण्याची प्रक्रिया सुरू केली.येत्या दोन ते तीन दिवसात सर्व प्रलंबित प्रकरणांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती गोपाळे यांनी दिली.
गोपाळे यांनी ज्या पद्धतीने तत्परता दाखवली त्या पद्धतीने जिल्ह्यातील गोपनीय विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवल्यास जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रकरणाची निर्गती लवकरात लवकर होऊ शकेल.अशी आशा बाळगायला हरकत नाही.शासकीय प्रक्रियेला तसा विलंब लागत असल्याचा अनुभव आहे. मात्र पोलीस अधीक्षक देशमुख यांनी देखील पोलीस ठाण्यांना वेळेत नवीन आवृत्तीचे टॅब उपलब्ध करून देण्याची तत्परता दाखविली.ही समाधानाची बाब मानावे लागेल.