पद्मश्री,बीजमाता राहीबाई पोपेरे यांचे बोरा महाविद्यालयात व्याख्यान
नवरात्रोत्सवा निमित्त १६ ऑक्टोबरला गुंफनार पहिले पुष्प
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: नवरात्रोत्सवा निमित्त येथील चां.ता. बोरा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मंच व महिला अत्याचार तक्रार निवारण समिती यांच्या वतीने ‘सन्मान कर्तृत्वाचा जागर स्त्रीशक्तीचा’ विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.पद्मश्री पुरस्कार प्राप्त बीजमाता राहीबाई पोपेरे या या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार असल्याची माहिती विद्यार्थिनी मंचच्या समन्वयिका प्रा.क्रांती पैठणकर यांनी दिली.
१६ ते २१ ऑक्टो.बोरा महाविद्यालयात सकाळी १०.३० ते ११.३० यावेळेत ही व्याख्यानमाला संपन्न होणार आहे. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. सी. मोहिते हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.
१६ ऑक्टो. रोजी राहिबाई पोपेरे ‘राहीबाई ते बीजमाता एक प्रेरणादायी प्रवास’ या विषयावर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफनार आहेत.१७ ऑक्टो. रोजी सामाजिक कार्यकर्त्या युवा उद्योजिका व कृषी कन्या श्रद्धा ढवण यांचे ‘शेण उचलाया सुद्धा अनुभव लागतो’ या विषयावर,१८ ऑक्टो.रोजी आकांक्षा स्पेशल चाइल्ड स्कूलच्या संस्थापिका राणी चोरे यांचे ‘फिरूनी नवी जन्मेन मी’ या विषयावर,१९ ऑक्टो.रोजी शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांचे ‘प्रशासन व महिला ‘या विषयावर,२० ऑक्टो.रोजी सामाजिक कार्यकर्त्या रंजनाताई शर्मा व अशोक शर्मा यांचे’ मायलेकांची साहित्यसेवा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून २१ ऑक्टो. सामाजिक कार्यकर्त्या,क्रांती संस्थेच्या संस्थापिका सुनिता भोसले या ‘भटक्या विमुक्तांच्या प्रश्नासाठी लढणारी रणरागिनी’या विषयावर शेवटचे पुष्प गुंफणार असल्याचे प्रा.पैठणकर यांनी सांगितले.
परिसरातील सर्व शेतकरी बंधू-भगिनीं,युवा उद्योजक तसेच महिला बचत गटातील महिलांसह सर्वच क्षेत्रातील महिलांनी व्याख्यानमालेस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन महिला लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समितीच्या समन्वयिका प्राध्यापक पल्लवी ताठे यांनी केले आहे.