शिरूर स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला शोधण्यासाठी शंभरहून अधिक पोलिसांचा फौज फाटा गुनाट निर्वी रोडवरील उसाच्या शेतात घुसला आहे. पोलिसांबरोबर स्थानिक नागरिक देखील शोध मोहिमेत सहभागी झाल्याचे चित्र आहे.
गाडी याचे लोकेशन त्याचे गाव गुनाट भागात आढळून आल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा गुनात परिसरात दाखल झाला. गुनाट एकूणच शिरूर तालुक्यातील उसाच्या क्षेत्रामध्ये बिबट्यांचा वावर आढळून आलेला आहे.अनेक ठिकाणी हल्ल्यात नागरिक ठार झाल्याचे वास्तव आहे. अशा अवस्थेत आरोपीला शोधणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे. तरी देखील शंभरहून अधिक पोलीस तसेच स्थानिक नागरिक यांनी गुनाट निर्वि रस्त्यावर भाऊसाहेब फंड यांच्या शेता भोवताली असणाऱ्या उसाच्या क्षेत्रात प्रवेश करून शोधमोहीम सुरू केली आहे. या क्षेत्रावर ड्रोनची नजर असून पोलीस ध्वनी प्रेक्षकाच्या माध्यमातून गाडे याला शरण येण्याचे आवाहन करताना दिसत आहे. संध्याकाळची वेळ असून उसाच्या क्षेत्रात बिबट्याच्या वावरामुळे गाडेची शोध मोहीम सुरू ठेवणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे.
गाडे याच्या शोध मोहिमेसाठी पुणे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ७० पोलिसांचे एक पथक गुनाट येथे ठाण मांडून आहेत.आज संध्याकाळी गणवेशातील शंभर पोलिसांचा फौज फाटा गुनाट येथे दाखल झाला. पुणे ग्रामीणचे दोन व साताऱ्याचे एक ड्रोन पथक क्राईमच्या दहा पथके शोध मोहिमेत सहभागी झाल्याचे उपयुक्त पिंगळे यांनी सांगितले. दिवस मावळताच पोलिसांनी शोध मोहीम थांबविली.१०० पोलिसांचे पथक पुण्याला रवाना करण्यात आले. मात्र शोध मोहीम सुरूच राहणार असल्याचेही पिंगळे यांनी सांगितले.