नगरपरिषद शाळेच्या शिक्षिकेची विद्यार्थ्यांना अनोखी भेट

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क 

शिरूर:नगर परिषदेच्या एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांप्रती असलेल्या सद्भावनेतून विद्यार्थ्यांसाठी शाळेला एक डिजिटल टीव्ही भेट दिला.स्वनिधी तसेच नातेवाईक व मित्र परिवाराकडून मिळालेल्या निधी एकत्र करून त्यांनी हा टीव्ही खरेदी केला.अँड्रॉइड मोबाईल प्रमाणे या टीव्हीचे कार्य असून विविध प्रकारच्या ॲप्स मुळे विद्यार्थ्यांना आनंदमय  डिजिटल शिक्षण मिळू लागले आहे.

       शिरूर नगर परिषद शाळा क्रमांक १ मध्ये कार्यरत असलेल्या उपशिक्षिका संपदा राठोड यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे या हेतूने शाळेला टीव्ही भेट दिला.पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा अलीकडे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण पद्धती आवडू लागली आहे.शिरूर नगरपरिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ई लर्निंग ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या शाळांमधील शिक्षक उच्चशिक्षित असून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण दिले जात आहे. सध्या डिजिटल इंडिया युग असून आपले विद्यार्थीही या प्रवाहात असावेत,त्यांना माहिती तंत्रज्ञान अवगत असावे तसेच भविष्यात स्पर्धेच्या युगामध्ये हे विद्यार्थी टिकावेत या हेतूने या विद्यार्थ्यांसाठी अँड्रॉईड स्मार्ट टीव्ही शाळेला भेट दिल्याचे राठोड यांनी सांगितले.अँड्रॉइड मोबाईल प्रमाणे या टीव्ही चे कार्य असून गुगल क्रोम च्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली जात आहे.या डिजिटल शिक्षण पद्धतीची विद्यार्थ्यांना गोडी लागली असून टच स्क्रीनच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतः हा टीव्ही संचलित करीत असल्याचे राठोड यांनी सांगितले.शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना विविध प्रकारची माहिती टीव्हीमुळे उपलब्ध होत असून याचा त्यांना भविष्यात मोठा फायदा होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
         सभागृह नेते प्रकाश धारीवाल,नगराध्यक्षा वैशाली वाखारे,शिक्षण मंडळ सभापती सचिन धाडीवाल, प्रशासन अधिकारी अशोक लांडे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभत असून मुख्याध्यापिका प्रतिभा आहेर, राजू लांघी,लहू गावडे,वनिता पडवळ,सोनाली माळी, प्रमिला तळेकर या सर्व शिक्षक सहकाऱ्यांचे देखील सहकार्य महत्त्वाचे असल्याचे राठोड यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.