शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: महाशिवरात्री निमित्त आयोजित रामलिंग महाराज यात्रोत्सवात आज एक लाखाहून अधिक भाविकांनी रामलिंगाचे दर्शन घेतले.रामलिंग ट्रस्ट तसेच शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीने भाविकांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधांमुळे भर उन्हातही भाविकांना सुलभपणे दर्शन घेता आले.
पहाटे रामलिंग महाराजांची पालखी रामलिंग येथे पोहोचल्यावर महाअभिषेक करण्यात आला.महाशिवरात्र असल्याने भाविकांनी रामलिंग मंदिरात दर्शनासाठी रात्री बारा पासूनच रांगा लावल्याचे दिसून आले.शिरूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रामलिंग मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांचा ओघ दिसून आला.एस टी महामंडळाने भाविकांसाठी विशेष व्यवस्था केली.याबरोबरच खासगी वाहनातून भाविक दर्शनासाठी जातानाचे चित्र होते.अनेक भाविकांनी पायी जाण्याचा आनंद लुटला.दरवर्षी प्रमाणे रामलिंगाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विविध संस्था संघटनांनी उत्स्फूर्तपणे भाविकांसाठी शीतपेय,उपवासाचे पदार्थ आदींची मोफत व्यवस्था केली.यामुळे भाविकांचा प्रवास सुकर होऊ शकला.
मंदिर परिसरात विविध प्रकारचे खाद्य पदार्थ,लहान मुलांची खेळणी तसेच विविध वस्तूंचे स्टॉल थाटण्यात आले होते.उन्हाळा असल्याने भाविकांना उन्हाची झळ पोहोचू नये म्हणून ट्रस्टच्या वतीने मंडपाची व्यवस्था करण्यात आली.दिवसभर भाविकांचा ओघ सुरूच राहिला.रामलिंग ट्रस्टच्या वतीने मंदिर आवारात देणगी कक्ष उभारण्यात आला होता.भाविकांनी उत्स्फूर्तपणे यास प्रतिसाद दिला.ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश भाऊ धारीवाल,सह चिटणीस तुळशीराम परदेशी,ट्रस्टचे खजिनदार पोपटराव दसगुडे, विश्वस्त गोदाजी घावटे,रावसाहेब घावटे, वाल्मीकराव कुरुंदळे,बलदेवसिंग परदेशी,नामदेवराव घावटे,सल्लागार जगन्नाथ पाचर्णे,बबनराव कर्डिले,शिरूर ग्रामीणचे माजी सरपंच अरुण घावटे, विठ्ठल घावटे,नामदेवराव जाधव,विद्यमान सरपंच शिल्पा गायकवाड,उपसरपंच बाबाजी वर्पे,सर्व सदस्य यांनी मंदिर आवारात आवर्जून हजर राहून यात्रा निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.अर्थात पोलिस निरीक्षक ज्योतिराव गुंजवटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यात मोलाची भूमिका बजावली.