लस हवी, सिरींज घेऊन या.. शिरूर लसीकरण केंद्राचा अजब प्रकार

मनसे विद्यार्थीसेनेने केला भांडाफोड

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण घ्यावे यासाठी शासन आग्रही असून सातत्याने शासनाच्या वतीने आवाहन केले जात आहे.एकीकडे ही परिस्थिती असताना येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांना सिरींज  विकत आणण्यास भाग पाडले जात आहे. गेली तीन ते चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून मनसे विद्यार्थी सेनेने याचा आज भांडाफोड केला.याचा निषेध म्हणून मनसेच्या वतीने रुग्णालय प्रशासनाला सिरींजचा बॉक्स भेट देण्यात आला.

            लसीकरणाचे महत्त्व पाहता शासनाने सर्व लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध केल्या आहेत. सर्वच नागरिकांनी लस घ्यावी यासाठी शासन आग्रही आहे. लस न घेणाऱ्यांवर विविध प्रकारे निर्बंधही लादले जात आहेत.ओमीक्राँनच्या नव्या व्हेरीयंटमुळे नागरिक लसीकरण केंद्रावर गर्दी करू लागले आहेत.शासनाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.असे असताना येथील लसीकरण केंद्रावर गेली तीन ते चार महिन्यांपासून लसीकरणास गेलेल्या नागरिकांना सिरींज विकत आणण्यास भाग पाडले जात आहे.याबाबत नागरिकांनी अद्याप कुठेही तक्रार केलेली नव्हती.मात्र आज मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी रांगेत असणाऱ्या सर्वच नागरिकांनी आपण सिरीज विकत आणल्याचे मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल माळवे यांना सांगितले.यावर माळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथील कर्मचाऱ्यांची संवाद साधला असता शासनाकडून सिरीज उपलब्ध झाल्या नसल्याचे सांगितले.वैद्यकीय अधिकारी  डॉ.तुषार पाटील यांनी तीन ते चार महिन्यापासून सिरिंजचा तुटवडा असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी केवळ दोन दिवसांपासून सिरींज असल्याचे शिरूरनामाशी बोलताना सांगितले.आज सिरींज उपलब्ध करून देण्यात आल्या असून उद्यापासून नागरिकांना सिरींज विकत घेऊन येण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी तीन ते चार महिन्यापासून सिरिंज उपलब्ध नसल्याचे सांगितले तर  वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेडे यांनी केवळ दोनच दिवस तुटवडा असल्याचे स्पष्ट केले.यातून अधिकाऱ्यांमधील असणारा विसंवादही दिसून आला.
         दरम्यान निषेध म्हणून मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने रुग्णालय प्रशासनाला सिरिंज बॉक्स भेट देण्यात आला.हा प्रकार गंभीर असून उद्यापासून नागरिकांना सिरिंज आणण्यास भाग पाडू नये अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा माळवे यांनी यावेळी दिला.लसीकरण संपूर्ण मोफत असताना येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांची नाहक पिळवणूक केली जात असल्याचे माळवे म्हणाले. सिरिंजचा तुटवडा का आहे?,याबाबत याबाबत शासनाशी पत्रव्यवहार केला आहे का? याचा तसेच रुग्णालय प्रशासनाचे यात काही आर्थिक लागेबांधे आहेत का याची चौकशी करावी अशी मागणी माळवे यांनी यावेळी केली. मनसेच्या पदाधिकारी डॉ.वैशाली साखरे माजी शहराध्यक्ष कांतीलाल शर्मा,सामाजिक कार्यकर्ते रमण भंडारी,शाम पवार आदी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.