शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या डामडौल न करता शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून शिरूर हवेली मतदार संघात विविध भागात कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी मोठे योगदान देणाऱ्या राव लक्ष्मी फाउंडेशनला कोविड रुग्णांच्या उपचारार्थ खर्चासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली.
वाढदिवस तो स्वतःचा असो किंवा लग्नाचा तो आपापल्या परीने मोठ्या ऐटीत साजरा करण्याची प्रथा अलीकडच्या रूढ होऊ लागली आहे.यात हजारो रुपयांचा चुराडा होताना आपण पाहत असतो.समाजात एकीकडे अशी उधळपट्टी करणारी मंडळी असताना, सामाजिक भान राखून, उपेक्षित घटकांना मदत करून वाढदिवस साजरा करणारी सकारात्मक विचारांची मंडळी देखील पुढे येऊ लागली आहे.शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे यांनी कोरोनाची संकटमय परिस्थिती पाहून लग्नाचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. शिरूर तालुक्यात दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.अशात आमदार अशोक पवार व कृषी पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार या दांपत्यासह त्यांचे चिरंजीव अध्यक्ष असलेल्या रावलक्ष्मी फाउंडेशन ने शिरूर-हवेली मतदारसंघात विविध भागात कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत.यामुळे शेकडो रुग्णांना दिलासा मिळत आहे. रावलक्ष्मी फाउंडेशन करीत असलेल्या दिलासादायक कार्याने प्रभावित होऊन राजेंद्र नरवडे व त्यांची पत्नी सुजाता नरवडे या दाम्पत्याने आपल्या लग्नाचे वाढदिवसाचे औचित्य साधून कोविड केअर सेंटर्ससाठी रावलक्ष्मी फाउंडेशनला एक लाख एक हजार रुपयांची देणगी अदा केली.
राजेंद्र नरवडे म्हणाले, कोरोना महामारीच्या या संकटमय प्रसंगात रावलक्ष्मी फाउंडेशन शिरूर हवेली तालुक्यात त्यांनी उभारलेल्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना देत असलेली सेवा कौतुकास्पद असून आपलाही यामध्ये खारीचा वाटा असावा या दृष्टिकोनातून या फाउंडेशनला मदत केली आहे.