शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:जमीन मोजणी,मालमत्ता नोंदणी,वारस नोंदणी, बक्षीसपत्र नोंदणी,वाटपपत्र नोंदणी,योजनापत्र,स्टीम उतारा,गटवारी पत्र,यासह विविध प्रकारचे जमिनीचे नकाशे देण्याचे काम आदी प्रकारची कामे ही काही दिल्याशिवाय करणारच नाही.अशा अलिखित नियमाप्रमाणे काम करणारे कार्यालय म्हणजे भूमी अभिलेख कार्यालय.
कोणता विभाग किती भ्रष्ट याबाबत दरवर्षी माहिती प्रसिद्ध होत असते.यात महसूल विभाग बऱ्याचदा पहिल्या क्रमांकावर असतो.या विभागातील भूमी अभिलेख हा विभाग सर्वाधिक भ्रष्ट म्हटलेतर वावगे ठरणार नाही.शिरूर भूमी अभिलेख कार्यालयाचे कामकाज पाहता,या प्रतिमेला ते तडा जाऊ देत नाही.याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.एखाद्या नागरिकाचे पालकाचे निधन झाल्यावर प्रॉपर्टी कार्डवर रितसर वारसनोंद करणे अत्यंत साधी बाब आहे.त्या नागरिकाचा तो अधिकार आहे.या कार्यालयात काही दिल्याशिवाय अशी नोंद होत नसल्याच्या असंख्य नागरिकांच्या तक्रारी आहेत.काही नाही दिल्यास त्या नागरिकास नाहक हेलपाटे मारावे लागतात.मालमत्ता पत्रकात झालेली चुकीची नोंद दुरुस्ती करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत मागणी केली जाते.शहरातील एका नागरिकाचे असेच प्रकरण आहे.या नागरिकाने २०२२ मध्ये जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाकडे क्षेत्र दुरुस्तीसाठी अर्ज केला होता.या अर्जानुसार जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाने तीन जानेवारी २०२३ ला शिरुर भूमी अभिलेख कार्यालयाला पत्र देऊन या संदर्भात कार्यवाही करण्याची सूचना केली होती.या पत्रानुसार आवश्यक ती सर्व कागदपत्रे या नागरिकाने शिरूर भुमिअभिलेख कार्यालयाकडे त्याचवेळी जमा केले.हे काम कधी होईल याबाबत संबंधित टेबलचे अधिकारी काळाने यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या नागरिकाला यासाठी एक लाख रुपये खर्च येईल असे सांगितले.या नागरिकांची परिस्थिती नसल्याने हा नागरिक गेली दीड वर्ष या कामासाठी हेलपाटे मारीत आहे.याप्रकरणी या नागरिकांनी भूमी अभिलेखचे उपअधीक्षक यांची अनेकदा भेट घेऊन काम मार्गी लावण्याची विनंती केली.मात्र काम अद्याप झाले नाही.अशा प्रकारचे नोंदीचे हे प्रतिनिधिक उदाहरण आहे.अशा प्रकरणांमध्ये काही दिल्याशिवाय दुरुस्ती करून मिळत नाही.असा नागरिकांचा अनुभव आहे.
जमीन मोजणीसाठी जमीन मोजणीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल केल्यावर मोजणी फी भरून त्याची नोंद मोजणी नोंदवहीत घेतली जाते. यानंतर अर्जदाराला आगावू नोटीसद्वारे मोजणीची तारीख कळवली जाते.तातडीची,अतितातडीची, अतिअतितातडीची अशा सुविधाही उपलब्ध आहेत.मोजणी अर्ज कोणत्याही प्रकारचा असो.क्वचितच रीतसर मोजणी केली जात असेल.टेबलावर चांगले वजन ठेवल्यास अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्वरित मोजणी करून दिली जाते.जे काही देत नाही.त्यांना मोजण्यासाठी फार प्रतीक्षा करावी लागते.एकूणच या कार्यालयात जी काही कामे केली जातात ती ‘अर्थ ‘प्राप्ती शिवाय केलीच जात नाही.अशा सातत्याने तक्रारी असतात.क्षेत्र एकत्रीकरण प्रकरणातही असाच अनुभव आहे.
पाच कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात मात्र तरीही फरक नाही.
गेल्या पाच ते सात वर्षात या कार्यालयाचे पाच कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत.मात्र याचा धडा न घेता बिनदिक्तपणे नागरिकांची लूट या कार्यालयात सुरू आहे.कोणाचा अंकुश नसल्याने ही मंडळी कोणालाच जुमानत नसल्याचे चित्र आहे.