शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:लग्नाची तारीख व वेळ ठरवताना मुहूर्त पाहण्याची प्रथा आहे.मुहूर्त म्हणजे खरतर शुभ दिवस,शुभ वेळ.मात्र बहुतांशी फक्त तारीखच मुहूर्तावरनुसार पाळली जाते.वेळ क्वचितच पाळली जाते.पुणे ग्रामीण पोलिस दलात काम करणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने आपल्या मुलाचे वेळेत (अगदी ५.१६ मि.)लग्न लावताना मुहूर्ताच्या महत्त्व अधोरेखित करून इतरांना चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला.
लग्न सीझनमध्ये आपल्याला आपले मित्र परिवार,नातेवाईकांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका येतात.लग्न पत्रिकेत शु.शके अमुक तारीख व वेळ या शुभ मुहूर्तावर असे नमूद असते.मोठ्या धार्मिक आस्थेने शुभ मुहूर्त काढला जातो.मात्र प्रत्येकालाच अनुभव असेल की,लग्न ठरलेल्या तारखेला होते मात्र नमूद शुभ वेळेस होत नाही.प्रतिष्ठित,आर्थिक संपन्न मंडळींच्या घरातील लग्न तर बहुतांशी वेळेत होत नाहीत.अलीकडच्या काळात तर लग्नकार्य इव्हेंट होऊन बसले आहे.लग्नाला मोठी गर्दी,मोठे नेते जमवणे प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले आहे.याची स्पर्धाही होऊ लागली आहे.लग्न सामान्य व्यक्तीचे असो वा धनदांडग्यांचे असो लग्नात आशीर्वादपर भाषणं ठरलेलीच असतात. उपस्थित नेत्यांची भाषणं हे एक मोठेपणाचे लक्षण मानले जाते.नेत्यांना माईक हातात आला की किती बोलावं आणि किती नाही याचं अनेकदा भान राहत नाही.यात शुभ मुहूर्ताची वेळ टळून जाते.उपस्थित वऱ्हाडी मंडळीही या भाषणांनी कंटाळून जातात. मुहूर्ताची वेळ टळण्यास केवळ हे एकच कारण नाही.नवरा तयार झाला तरी नवरीचा मेकअप झालेला नसतो.निवेदक सारखे लग्नाची वेळ झाली मुलीच्या मामांनी मुलीला लग्न मंडपात/ हॉलमध्ये घेऊन यावे म्हणून आवाहन करीत असतो.अनेकदा बाहेरगावाहून येणारे वऱ्हाड वेळेत येत नाही.अनेकदा लोकप्रतिनिधींची वाट पाहत बसल्याने वेळ होतो.शिरूरमध्ये एका लग्न कार्यात आशीर्वादपर भाषणे झाली.मंगलअश्टका सुरू करण्यात आली.एक अश्टका संपली अन् एक नेता आला.त्यावेळी ब्राम्हण काकांना थांबवून त्या नेत्याला आशीर्वादपर भाषण करण्याची संधी देण्यात आली.या भाषणानंतर पुढील मंगलाष्टका घेण्यात आल्या.अशा ना ना प्रकारच्या कारणामुळे वेळ पाळली जात नाही.
पुणे ग्रामीण पोलीस दलात डी एस बी विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक नानासाहेब काळे यांचा मुलगा अक्षय व वाडेगव्हण येथील संतोष शेळके यांची कन्या ऋतुजा यांचे ५ जुलैला लग्न पार पडले.पत्रिकेत पाच वाजून १६ मिनिटांची मुहूर्त वेळ होती.नानासाहेब यांनी मुहूर्ताची वेळ पाळत आपल्या मुलाचे लग्न लावले.नानासाहेबांचा वेळ पाळण्याचा अनुभव असणाऱ्या बहुतांशी मंडळींनी वेळेत हजेरी लावली.मात्र लग्न वेळेत लागत नाही याचा मोठा अनुभव पाठीशी असणाऱ्या मंडळींनी नेहमी प्रमाणे उशिरा हजेरी लावली.वेळेत लग्न लागल्याने नानासाहेबांची भेट घेऊन परतण्याशिवाय या मंडळींकडे पर्याय नव्हता.वेळेत लग्न लागल्याने लग्न हॉलमध्ये बराच वेळ याबाबतची चर्चा होती.या आधीचीही लग्नकार्य नानासाहेबांनी अगदी वेळेत पार पाडली आहेत.शुभ तारीख आणि शुभ वेळ असावी यासाठी आपण मुहूर्त पाहतो.मग ती वेळ पाळणे आम्ही गरजेचे समजतो व ते कटाक्षाने पाळतो.असे नानासाहेब यांनी ‘शिरूरनामाशी’ बोलताना सांगितले.अशाप्रकारे वेळेत लग्न लागली तर मुहूर्ताचे व वेळेचे महत्त्व राहील.तसेच उपस्थितांना ताटकळत बसावे लागणार नाही.