जोगवा मागणाऱ्या हातांनीच अडचणीत सापडलेल्यांना दिला मदतीचा जोगवा
या हातांना शिरूर तालुका पत्रकार संघाने दिला मदतीचा हात
शिरूर: जोगवा मागणाऱ्या हातांनीच लॉकडाऊनच्या कालावधीत अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा जोगवा देऊन दातृत्वाचा एक आदर्श समाजासमोर ठेवला…… याच हातांना शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाने मदतीचा हात देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
शहरात चौदा तृतीयपंथी घटक एकत्र राहतात. जोगवा मागून तसेच देवीचे गाण्याचे कार्यक्रम करून हे घटक आपला उदरनिर्वाह करतात. जानेवारी ते जुलै हा कालावधी देवीच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचा सिझन असतो. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या घटकांना कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. लॉक डाऊन सुरू झाल्यापासून त्यांचे कार्यक्रम बंद आहेत. मात्र जानेवारी ते मार्च या कालावधीत मिळालेल्या उत्पन्नातून जोगवा मागणाऱ्या या हातांनी अडचणीत सापडलेल्या अनेक कुटुंबांना जीवनावस्तूंच्या माध्यमातून मदतीचा जोगवा देऊन दातृत्वाचा एक आदर्श निर्माण केला. गेली अडिच महिने हे घटक अन्नदान करीत आहेत. मदत करून स्वतःची झोळी खाली झाल्यावर त्यांना स्वतःलाच मदतीची गरज निर्माण झाली…. शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी ‘एक हात मदतीचा ‘या उपक्रमांतर्गत या घटकांना त्यांच्या घरी जाऊन मदतीचा हात दिला……लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हातावर पोट असणाऱ्या तसेच व्यवसाय बंद झाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या घटकांना ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाद्वारे मदतीचा हात देण्याचे सत्कार्य शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांच्या द्वारे लॉकडाऊन शिथील झाल्यानंतरही अविरतपणे सुरू आहे…. तृतीयपंथी घटकांच्या प्रमुख सुहाना गिरी यांनी मदत केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.बारहाते यांच्या ‘एक हात मदतीचा ‘ या उपक्रमाचे कौतुकही केले.या वेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रविण गायकवाड, माजी अध्यक्ष मुंकुद ढोबळे, उपाध्यक्ष नवनाथ रणपिसे, सरपंच बिपीन थिटे, सरपंच दिपक दुडे पाटील, गोरक्षनाथ ईरोळे उपस्थित होते .