शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेत शिरूरच्या अक्षय पंडित वेताळ या वरिष्ठ शास्त्रज्ञाचाही खारीचा वाटा असून शिरुरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
२०१७ पासून अक्षय हा इस्त्रोच्या अहमदाबाद शाखेत वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे.चांद्रयानाचे पार्ट बनविण्यात तसेच त्याची तपासणी करण्याचा टीममध्ये अक्षय याचा समावेश होता.गेली चार वर्षांपासून अक्षय व त्याची टीम यानाच्या पार्टच्या तपासणीकामात व्यग्र होते.इस्त्रोच्या मुख्यालयात काल त्यांच्या भारतातातील सर्व शाखेतील टीम उपस्थित होती.यात अक्षयचा अहमदाबाद टीममध्ये समावेश होता.चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताच अक्षयने एकच जल्लोष केला.अक्षयचे प्राथमिक शिक्षण तालुक्यातील मलठण व आमदाबाद जिल्हा परिषद शाळेत झाले.पाचवी ते बारावी (सायन्स) विद्याधाम प्रशाला,शिरूर येथे झाले.यानंतर त्याने तिरुअनंपुरम,केरळ येथील एपीजे अब्दुल कलाम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात प्रवेश घेतला.चार वर्ष बीटेक पुर्ण झाल्यावर २०१७ ला तो अहमदाबाद येथील इस्त्रोच्या शाखेत शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाला.सध्या तो याच शाखेत वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे.
अक्षयचे वडील पंडित वेताळ व आई कांचन वेताळ हे दोघेही रांजणगाव गणपती येथील जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. चांद्रयान यशस्वी मोहिमेत आपल्या मुलाचा खारीचा वाटा असल्याचा या दांपत्याला विशेष आनंद झाला असून त्याच्याकडून अशीच देशसेवा घडत राहो,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.अक्षय व त्याच्या पाल्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.