शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:प्रचंड प्रतिभा असताना ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देऊन आपल्या अतुल्य वैद्यकीय सेवेतून देशभरात आपली ख्याती निर्माण केलेल्या डॉ.स्वप्नील भालेकर यांची वैद्यकीय सेवा कौतुकास्पद तसेच प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे काढले.
व्हिजन केअर सेंटर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या लॅसिक लेसर सेंटरचे लोकार्पण महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महसूल मंत्री थोरात बोलत होते.आमदार अशोक पवार, सुधीर तांबे, सभागृहनेते प्रकाश धारिवाल,अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके,,निवृत्त सनदी अधिकारी किशोर राजे निंबाळकर नांदेडचे जिल्हाधिकारी इटणकर आदी यावेळी उपस्थित होते.थोरात म्हणाले डॉ.भालेकर हे शहरातही रुग्णालये उभारू शकले असते.तेथे त्यांना मोठा प्रतिसादही मिळाला असता मात्र त्यांनी ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा देण्यास प्राधान्य दिले. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.थोरात यांच्या मतदार संघातील आदित्य नावाचा मुलाच्या डोळ्यात चुना गेला होता यामुळे त्याला अंधत्व आले होते.या मुलाच्या पालकांनी मुलाला दृष्टी परत यावी म्हणून हैदराबाद चेन्नई आधी शहरात जाऊन प्रयत्न केले.मात्र त्यांना यश आले नाही.थोरात यांनी या मुलाच्या पालकांना मुलास शिरूर येथील डॉ.भालेकर यांच्याकडे उपचार घेण्याचा सल्ला दिला.डॉ.भालेकर यांनी या मुलाच्या एका डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने या मुलास पुन्हा दृष्टी प्राप्त झाली.विशेष म्हणजे आज कार्यक्रमाला येताना महसूल मंत्री थोरात यांनी आदित्य यास सोबत आणले होते.आपल्या भाषणाच्या वेळी त्यांनी आदित्य यास व्यासपीठावर बोलावून हा किस्सा उपस्थितांना सांगितला.जिथे देशातील मोठ्या शहरांमध्ये आदित्यवर उपचार होऊ शकले नाही तिथे ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉ.भालेकर यांनी आपले कौशल्य दाखवून देशभरात आपली ख्याती निर्माण केली असे गौरवोद्गार थोरात यांनी यावेळी काढले.
आमदार पवार यांनीही डॉ.भालेकर यांचा भारतात लौकिक असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले. कोरोना काळात डॉ.भालेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचा उल्लेख पवार यांनी आवर्जून केला.डॉ. भालेकर यांनी शिक्रापूर येथेही आपल्या रुग्णालयाची शाखा सुरू केली आहे.कितीही शाखा सुरू करा मात्र शिरूर सोडून जाऊ नका असे मिश्किलपणे आमदार पवार म्हणताच,शिरूर सोडणार नाही असे म्हणत डॉ. भालेकर यांनी त्यांना आश्वस्त केले.यावेळी आपल्या भाषणात सर्वच मान्यवरांनी डॉ.स्वप्निल व डॉ.सोनाली भालेकर या दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
आपल्या प्रास्ताविकात डॉ.भालेकर म्हणाले, साधारण चार कोटी रुपये किंमत असल्याने भारतातील मेट्रो सिटी सोडून अगदी जिल्हा पातळीवर देखील लॅसिक लेसर हे मशीन उपलब्ध नाही.भारतामध्ये प्रथमच ग्रामीण भागामध्ये व्हीजन आय केअर च्या माध्यमातून हे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे.या तंत्रज्ञानामुळे आता कितीही दूरचा नंबर कायमचा घालविणे शक्य होणार आहे.शहरांमध्ये ५० हजार ते १ लाख रुपये खर्च असणारी ही शस्त्रक्रिया सेवा आम्ही केवळ ३० हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ.भालेकर यांनी सांगितले.गेल्या आठ वर्षात एक हजाराहून अधिक किचकट शस्त्रक्रिया करून वर्षानुवर्ष अंधकारमय जीवन जगणाऱ्या देश-विदेशातील रुग्णांना दृष्टी देऊ शकल्याचे समाधान असल्याचे डॉ.भालेकर यांनी यावेळी सांगितले.यामध्ये
इराक,सीरिया, इथिओपिया व इराण या देशातील रुग्णांचा समावेश आहे.रावसाहेब चक्रे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.सोनाली भालेकर यांनी आभार मानले.
डॉक्टर भालेकर यांनी लॅसिक लेसर मशीनद्वारे प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांची सुकन्या साक्षी धारीवाल यांच्या डोळ्यावर सर्वात प्रथम यशस्वी शस्त्रक्रिया केली.यावर महसूल मंत्री थोरात म्हणाले, धारिवाल देशातच काय परदेशात कोठेही आपल्या मुलीवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया करू शकले असते.मात्र त्यांनी डॉक्टर भालेकर यांच्याकडे शस्त्रक्रिया करण्यास प्राधान्य दिले. भालेकर यांच्या वैद्यकीय विद्वत्तेचे यापेक्षा आणखी चांगले काय प्रमाणपत्र असू शकते.