कोरोना वैद्यकीय सेवेसंदर्भात इतर तालुक्यांच्या तुलनेत शिरूर मध्ये खूप कमी सुविधा-माजी खासदार आढळराव पाटील
मडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनच्या संदर्भात सरकारने योग्य प्रकारे नियंत्रण करणे गरजेचे
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:कोरोना वैद्यकीय सेवेसंदर्भात इतर तालुक्यांच्या तुलनेत शिरुरमध्ये खूप कमी सुविधा आहेत.यामध्ये वाढ होणे गरजेचे आहे.अशी अपेक्षा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे व्यक्त केली.
आढळराव पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटून त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी व कुठे काय कमतरता आहे हे पाहण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड आरोग्य सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी शिरूरमध्ये असणारी कोविड केअर सेंटर्स, या सेंटर्समध्ये असणारे बेडची संख्या,ऑक्सिजन तसेच रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता याबाबत वैद्यकीय अधिकारी सचिन शिंदे यांच्याकडून माहिती घेतली.ग्रामीण रुग्णालय मध्ये तीस बेड असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिरूर सारख्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामधे असणाऱ्या बेडची संख्या फारच कमी असून किमान शंभर ते दोनशे बेड या रुग्णालयात असायला हवे असे आढळराव पाटील म्हणाले. इतरही सुविधा पाहता इतर तालुक्याच्या मानाने शिरुर मध्ये खूप कमी सुविधा आहेत अशी खंत आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.
आढळराव पाटील म्हणाले,गेल्या आठ दिवसा पासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून रेमडेसिविर इंजेक्शन तसेच ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली आहे.या परिस्थितीत सरकारने यावर योग्य रीतीने नियंत्रण करणे गरजेचे आहे.काल पुणे जिल्ह्यात पंधरा हजार रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी होती.मात्र शासनाकडून केवळ अकराशे इंजेक्शन्स जिल्ह्याला उपलब्ध झाले.१०० पैकी ८० रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देत बसलो तर ही मागणी कधीच पूर्ण होणार नाही.डॉक्टरांनी देखील आवश्यक त्याच रुग्णाला इंजेक्शन देताना सर्रासपणे हे इंजेक्शन देणे टाळायला हवे.केंद्र शासनाने रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आणली आहे.यामुळे निर्यातीसाठीच्या इंजेक्शनचा मोठा साठा देशात उपलब्ध आहे. हा साठा देशात वितरित होण्यासाठी केंद्र सरकारने नियोजन करणे गरजेचे असल्याचे आढळराव पाटील म्हणाले.शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख संजय देशमुख,शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद,रवींद्र करंजखेले,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, वैद्यकीय अधिकारी कैलास बत्ते,शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर थोरात ,माजी शहर प्रमुख सुनिल परदेशी,आकाश खांडरे,पप्पू गव्हाणे,निखिल केदारी आदी यावेळी उपस्थित होते.
सध्या शिरुर शहरात चां.ता.बोरा महाविद्यालयात कोविड केअर सेंटर असून येथे ७२ बेड आहेत. विघ्नहर्ता,मातृछाया,संकल्प व चोरे या रुग्णालयांमध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स आहेत. या चार रूग्णालयात मिळून एकूण ४४ बेड आहेत. तर श्री गणेशा,मातोश्री मदनबाई धारिवाल व वेदांता या रुग्णालयांमध्ये डेडिकेटेड कोविड रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या रुग्णालयांमध्ये अनुक्रमे ४२,३० व ६५ बेड उपलब्ध आहेत.उपरोक्त नमूद केलेल्या सर्व रुग्णालयांमधील बेड पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.अशी माहिती वैद्यकीय अधिकारी शिंदे यांनी आढळराव पाटील यांना दिली.