कोरोनामुळे पालक गमावलेल्या १४७ बालकांना मिळणार शासनाची मदत
सुजाता पवार यांनी बालकांची आस्थेने केली विचारपूस
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:कोरोनामुळे पालक गमावलेल्या तालुक्यातील १४७ बालकांना मिशन वात्सल्यअंतर्गत शासनाच्या वतीने मदत दिली जाणार असून बालकल्याण समितीच्या वतीने यासंदर्भातील प्रस्तावाची तपासणी केल्यानंतर याबाबतचे आदेश तयार करण्यात आले.
शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या मिशन वात्सल्य अंतर्गत “शासन आपल्या दारी”या कार्यक्रमाचे पुणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पंचायत समिती व एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या वतीने येथे आयोजन करण्यात आले.कोरोनामुळे एकल पालक तसेच दोन्हीही पालक गमावलेल्या बालकांच्या प्रस्तावांची बालकल्याण समितीच्या सदस्या सविता फटाले,बिना हिरेकर,ॲड.ममता नंदनवार यांच्यावतीने तपासणी करण्यात आली.यात १४७ बालक पात्र ठरले.पात्र ठरलेल्या बालकांच्या बालसंगोपनाचे आदेश यावेळी तयार करण्यात आले.जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार, पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे, गटविकास अधिकारी विजय नलावडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी(ग्रामीण) निर्मला चोभे, धुमाळ,तालुका संरक्षण अधिकारी युवराज गाढवे,रुपल साळुंके आदी वेळी उपस्थित होते.मिशन वात्सल्य अंतर्गत पात्र ठरलेल्या बालकांना त्यांचे वय वर्ष अठरा पूर्ण होईपर्यंत शासनाच्या वतीने दरमहा अकराशे रुपयाची मदत त्यांना केली जाणार आहे.प्रकल्प विस्तार अधिकारी,सहायक प्रकल्प अधिकारी, सर्व पर्यवेक्षिका व अंगणवाडी कार्यकर्ता यांचे प्रस्ताव तयार करण्याकामी सहकार्य लाभले.
जैन फाउंडेशन एनजीओ ० ते ५ वयाच्या बालकांना दरमहा ७०० रुपयांची मदत करणार असून पाच वर्षावरील मुलांच्या शाळेची फी भरणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावांची जैन फाउंडेशन स्वतः तपासणी करणार असून तपासणीनंतर बालकांची निवड केली जाणार आहे.
आज उपस्थित १४७ बालकांपैकी बहुतांशी बालकांचे वडील,म्हणजेच घरातला कर्तापुरुष कोरोनामुळे मृत झाल्याचे निदर्शनास आले.सुजाता पवार यांनी या बालकांची व त्यांच्या आईची आस्थेने विचारपूस केली. या बालकांपैकी वय वर्षे एकच्या आतील दहा बालके होती.या बालकांना पाहून पवार यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांचेही डोळे पाणावले.