भाजपाचे एक ऑगस्टला राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन

शासनाने प्रति लिटर तीस रुपये प्रमाणे दूध खरेदी करण्यााची मागणी

0
शिरूर: गायीच्या दूधाला सरकट दहा तर दूध पावडरला प्रतिकिलो पन्नास रुपयांचे अनुदानाच्या मागणीसाठी भाजपाच्या वतीने एक ऑगस्टला दूध संकलन बंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे यांनी दिली.याबाबतचे निवेदन आज तहसिलदारांना देण्यात आले.निवेदनासोबत मंत्र्याना पाठवण्यासाठी दूधही देण्यात आले.
          निवेदनानुसार,राज्यात दिडशे लाख लिटर गायीचे दुधाचे संकलन आहे. यापैकी खासगी संस्था व डेअरीकडून ९० लाख लिटर, सहकारी संस्थांकडून ३० लाख लिटर दूध खरेदी केले जाते.तर ३० लाख लिटर दूधाची शेतकऱ्यांद्वारे हॉटेल्स व ग्राहकांना विक्री केली जाते. सध्याची परिस्थिती पाहता खासगी व सहकारी दूध संघांकडून २० ते २२ रूपये दराने दूध खरेदी केले जात आहे.तर हॉटेल्स बंद मुळे दूधाच्या मागणीत घट झाली आहे. यामुळे दुधाचा उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. यातच दहा लाख लिटर दूध २५ रूपये दराने खरेदी करण्याची घोषणा करणाऱ्या शासनाकडून प्रत्यक्षात सात लाख लिटरच दूध खरेदी केले जात आहे. मंत्र्यांचे लागेबांधे असणाऱ्या दूध संघांकडूनच शासन दूध खरेदी करीत असून इतर दूध उत्पादकांवर शासन अन्याय करीत असल्याचा आरोप फराटे यांनी केला आहे.
          शेतकऱ्यांना बॅकांकडून कर्जपुरवठा नाकारला जात असून नकली बियाणे, युरीया,खताचा तुटवडा तसेच काळा बाजार यामुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत.यातच दूधाचे भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या या समस्येचा गांभीर्याने विचार करून शासनाने गाईच्या दूधाता प्रतिलिटर दहा रुपये तर दूध पावडरला प्रतिकिलो पन्नास रुपये अनुदान मिळावे तसेच शासनाने प्रतिलिटर तीस रुपये प्रमाणे दूधाची खरेदी करावी अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली असून या मागणीसाठी एक ऑगस्टला दूध संकलन आंदोलन केले जाणार असल्याचे फराटे यांनी सांगीतले.काका खळदकर,आबासाहेब सोनवणे, महेश बेंद्रे,नितिन पाचर्णे ,रोहीत खैरे, जिजाऊ दुर्गे, बाबुराव पाचंगे,शामकांत वर्पे, गोरक्ष काळे, डॉ. राजेंद्र ढमढेरे, रविंद्र दोरगे, जयेश शिंदे आदि यावेळी उपस्थित होते.

 

शासनाने प्रति लिटर तीस रुपये प्रमाणे दूध खरेदी करण्यााची मागण

Leave A Reply

Your email address will not be published.